“घराकडे परत चला”
“मैत्री” चा केरळ पुरानंतरचा प्रतिसाद

घरातलं सगळं भिजून ओलंकच्च झालं आहे

असं म्हणतात की “शांतता असेल तेंव्हा युध्दाची तयारी करायची असते आणि युध्द शांतता प्रस्थापित करण्यासाठी करायचं असतं”.

संकटांचं असंच आहे. संकट आलं की सगळं पुन्हा आलबेल व्हावं म्हणून झटावं लागतं आणि सगळं आलबेल असताना संकट येऊच नये म्हणून सावध रहायचं असतं आणि तरीही संकट आलं तर नुकसान कमीत कमी कसं होईल हा प्रयत्न करायचा असतो.

“मैत्री” हीच गोष्ट गेल्या २१ वर्षांच्या काळात ९ मोठ्या नैसर्गिक संकटांनंतर झालेल्या वाताहतीतून मार्ग काढताना शिकली. मग तो भूज चा भूकंप असो की त्सुनामी. किंवा, कोकणातला पूर असो की मेळघाटातलं कुपोषण आणि त्यातून होणारे बालमृत्यू.

मेघाटहून केरळला:

ह्या बालमृत्यू वरून आठवलं की १९९७ साली ज्या पाड्या-वाड्यांमध्ये बालमृत्यूंनी थैमान घातलं होतं त्या गावातील आमच्या मित्रांनी आजच केरळसाठी ६,००० रूपये जमवल्याचं आणि ६०० किलो तांदूळ जमवल्याचं समजलं. एकमेकांना मदत करण्याची ही वृत्ती माणुसकीचं प्रतिक तर आहेच पण त्यात तिथल्या गावसमाजाची सामूहिक प्रगल्भताही आहे. “मैत्री”नी काम करताना आजपर्यंत कुठलंही वाटप न करता, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचं आणि सक्षमता हेच उद्दिष्ट असल्याचं जे तत्व जपलं त्याचा हा परिणाम आहे. आमच्या मेळघाटातील कामातील ही एक ऐतिहासिक घटना आहे.

पुराचा तडाखा:

केरळमध्ये पाणी वाढत असतानाच “मैत्री”च्या मित्रांचं त्याकडे लक्ष होतं. रोजच्या रोज परिस्थितीचा अंदाज घेण्याचं काम चालू होतं. पूर सर्वात जास्त असतो तेंव्हा आपल्यासारख्या लांब रहात असलेल्यांना फार काही करता येत नाही. कारण, मोठा भूप्रदेश पूरानं वेढलेला असताना तिथे जाऊन फार उपयोग होत नाही. आणि, काम करणारी खूप माणसं तिथे नेऊन तिथल्या मदतकार्यावर ताणही आणणं योग्य नाही. पुरात लोकांची सुटका करणं हे सैन्य, प्रशिक्षित पण स्थानिक कार्यकर्ते ह्यांचंच काम असतं. तेच ते करू शकतात.

म्हणून पूर जरासा ओसरायला लागल्यावर, दोन-तीनच दिवसांनी, “मैत्री”चे दोन प्रशिक्षित मित्र तिथे पोचले. विनिता आणि शिरीष जोशी. दोघांमध्ये मिळून त्यांना अशा १७-१८ विविध नैसर्गिक संकटातील कामांचा अनुभव आहे. तसं त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे.

पहिले दोन-तीन दिवस फिरून आपण नेमकं कुठे काम केलं पाहिजे ह्याचा नेमका अंदाज घेऊन त्यांनी कळ्ळूर हे थ्रिसूरमधील ११-१२ वस्त्यांचं गाव निश्चित केलं.

पुराचा सर्वदूर परिणाम:

तिथे पोचण्याआधीचेही त्यांचे अनुभव फार शिकण्याजोगे आहेत. एक तर धरणातील पाण्याचं वाटप, पाणी सोडण्याच्या वेळा ह्यात खूप गोष्टी चुकत गेल्या. मोठ्या जंगलतोडीमुळे, जमिनीची धूप झाल्यानं मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं होतं. त्यामुळे दरडी कोसळूनही मृत्यू झाले होते. नदीच्या पात्रापासून पाच-सात किलोमीटर्स आणि जमिनीपासून १२-१५ फूट पाणी राहिलेलं आणि ते सुध्दा तीन-चार तर काही भागात पाच-सहा दिवस. त्यामुळे लोकांच्या घरा-दाराची वाताहत झालेली आहे. कपडे, गाद्या, फ्रीज-टिव्ही सारख्या इलेक्ट्राॅनिक वस्तू, धान्य, लाकडी फर्निचर भिजून संपलेलं आहे. विहिरींमध्ये दूषित पाणी, चिखल जाऊन पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत खराब झालेले आहेत. जनावरं फार मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडलेली आहेत. त्यांची विल्हेवाट लावणं आणि ह्या वाया गेलेल्या वस्तू, ज्या लोकांनी टाकून दिलेल्या आहेत, एकत्र करून त्याचा कचरा बाजूला करणं हे एक मोठं काम आहे. “मैत्री” चा कोकण, मुंबई, मध्यप्रदेश इथल्या पुराचा अनुभव गाठीशी आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात तिथे मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग पसरणार आहेत. त्याचा मुकाबला केला नाही तर पुरानं जितकं नुकसान झालं नाही त्यापेक्षा अधिक नुकसान साथींच्या रोगानं होईल असा आमचा अंदाज आहे.

विहिरी साफ करणं महत्वाचं :

ह्याच नुसार आज मी हे लिहितो आहे तो पर्यंत त्या गावाच्या आसपासच्या वाड्या-पाड्यातील ४१५ विहिरीतील चिखल, गाळ उपसून त्या साफ करून देण्याचं महत्वाचं काम “मैत्री” नी केलं. अजून ते चालू आहे. त्यामुळे सुमारे ३,००० लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता लवकरात लवकर त्यांच्या चुली सुरू करणं महत्वाचं आहे. चूल सुरू झाली की घर सुरू झालं म्हणायचं. पण चूल सुरू करण्याआधी लोक त्यांच्या सरकारनं त्यांना दिलेल्या तात्पुरत्या निवासातून (कॅम्प) लोक घरात रहायला सुरूवात करतील हे पहायला पाहिजे. त्यांची घरं ओलीकच्च झाली आहेत. त्यामुळे निदान त्यांना घरात झोपता येईल अशी व्यवस्था करणं, त्यासाठी प्लॅस्टिक चे मोठे ताव देणं, चादरी-गाद्या देणं, घरगुती वस्तू देणं जसं की मसाला, धान्य, कपडे पुरवणं, त्यांचे सेप्टिक टॅन्क्स साफ करणं, पर्यावरणीय स्वच्छता राखणं ही कामं ह्या पुढील दोन ते तीन आठवडे करावी लागतील. ह्यासाठी “मैत्री” चे दोन प्रशिक्षित स्वयंसेवक — दत्ता आणि अजिंक्य — तर तिथे आहेतच परंतु मनोज आणि जिबू असे दोघे स्थानिक मल्याळी भाषा जाणणारेही तिथे आहेत. अर्थात त्यांच्या बरोबर १०-१२ जणांची स्थानिक टीमही त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढते आहे.

तुमच्या मदतीची गरज आहे :

ह्या सर्वासाठी “मैत्री” तुमच्या-माझ्यासारख्यांवरच अवलंबून असते. हे आज आत्ता मी हे लिहित असताना “मैत्री”कडे ३,११,१२५ रूपये, काही धान्य, काही कपडे असे जमा झाले आहेत. अर्थात अजून मदत हवी आहे. तुम्ही जितकी मदत कराल तितकं काम आपल्याला करता येईल. कारण आत्ता जरी मदतकार्य चालू असलं तरी त्यांच्या घरबांधणीचं कामही करावं लागेल. त्यामुळे तुमच्या मदतीच्या हातांची गरज आहे. तुम्ही वेळ देऊ शकता आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष मदतकार्य करू शकता. ह्यासाठी आर्थिक मदत देऊ शकता. १ रूपयांपासून कितीही. आर्थिक मदत गोळा करू शकता. कपडे, गाद्या, चादरी ह्यासारख्या गोष्टी गोळा करू शकता.

माझा अनुभव सांगतो.

नैसर्गिक संकटानंतर जो संहार झालेला असतो त्यात काम करण्यामुळे आपल्याला आपण सध्या किती चांगल्या स्थितीत आहोत ह्याचं भान येतं. असं संकट येऊ नये म्हणून प्रयत्न करण्यासाठी मनाची तयारी होते. संकट आल्यावर त्याला तोंड देण्याची तयारी होते. मनाच्या एका बाजूला असलेल्या करूणा, कणव, आस्था ह्यासारख्या प्रेरणांना जाग येते. आपण माणूस म्हणून रहाण्यासाठी, टिकण्यासाठी ह्याची ह्याची फार आवश्यकता असते. असं संकट आपल्यावरही येईल ही भावना आपला संयत शहाणपणा टिकवण्यासाठी उपयोगाचा असतो.

दुसरं अजून एक. अशी काम करतात अशा संस्था, असे उपक्रम हे पैसे खाण्यासाठी असतात, ह्यानं पैसे वाया जातात, ह्यातल्या लोकांचा ह्यात स्वार्थ असतो, ह्यातून ते प्रसिध्दी कमावतात असा तुमच्या मनात ग्रह असेल तर तो ही काढून टाका. ह्यात काम करतो आहोत अशांचाही एक प्रकारचा स्वार्थ ह्यात असतो.. तो कसा सांगतो.. इतक्या माफक दरात आपलं मन साफ करून देण्याचं आणि त्यातली करूणा टिकवण्याचं काम कुठे घडतं, सांगा बरं? त्यामुळे सगळेच भ्रष्टाचारी असतात असा ग्रह करून घेऊ नका.. गेली २१ वर्ष आम्ही “मैत्री”मध्ये ह्यातली गुणवत्ता जपासण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न कसोशीनं केला आहे. आमचे हिशेब तुम्हाला कधीही बघता येतात. दरवर्षी आम्ही ते आपल्या जाहीर कार्यक्रमात सर्वांसमोर मांडतो. गेल्या २१ वर्षात “मैत्री” नी त्यांच्या विश्वस्तांवर एक रूपयाही खर्च केलेला नाही. त्यामुळे जितकं पारदर्शी रहाता येईल, जितकी खुली निर्णयप्रक्रिया करता येईल तितकी खुली प्रक्रिया करण्याचा “मैत्री” करत असते.

तेंव्हा सहभागी होण्यासाठी अजिबात मागेपुढे पाहू नका.

अधिक माहिती साठी संपर्क साधा :: maitri1997@gmail.com

“मैत्री” ही गेल्या वीस वर्षांपासून स्ययंस्फूर्त प्रेरणेनं काम करते. “मैत्री” ला ह्यापूर्वीच्या एकूण ९ नैसर्गिक संकटात काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. संस्था रजिस्टर्ड आहे. संस्थेचे सर्व हिशेब पारदर्शी असतात. संस्थेचा एक पैसाही विश्वस्तांवर खर्च होत नाही. हिशेब कुणालाही कधीही पहाता येतात.

ई देणग्यांसाठी : HDFC Bank, Mayur Colony, Pune. Account №01491450000152.. RTGS/NEFT Code — HDFC0000149 . MICR Code — 4411240009 …

“मैत्री” ला दिलेल्या देणग्यांना इनकम टॅक्सच्या ८० जी खाली सूट आहे. तुम्ही “मैत्री” किंवा “MAITRI” च्या नावानं धनादेश काढून तो “मैत्री” च्या पत्त्यावर म्हणजे “मैत्री”, कल्याण ३२, नटराज सोसायटी, कर्वेनगर, पुणे ४११ ०५२ ला पाठवू शकता.. किंवा मैत्री च्या संकेतस्थळावर जाऊ शकता www.maitripune.org अथवा फोन करा ९८६०००८१२९ किंवा ०२०-२५४५०८८२…

लक्षात असू दे. संकटं आपल्याला शिकवतात. वागायचं कसं, रहायचं कसं ते सांगतात.

आपल्यातील माणुसकीचा दिवा तेवता ठेवतात.

संकटात काम करण्यानं आपल्या मनाची तयारी होते. अवघड परिस्थितीत कसं वागायचं ह्याचे धडे मिळतात.

आज जी परिस्थिती केरळात आहे उद्या तीच परिस्थिती आपल्यावर आली तर आपण अधिक तयारीत रहातो, जरी तसं संकट येऊच नव्हे अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा असली तरी..

तुमच्या प्रतिसादाची वाट पहातो..

अनिल शिदोरे
“मैत्री” स्वयंसेवक
anilshidore@gmail.com

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.