रूडयार्ड किपलिंग च्या सुप्रसिध्द अशा ‘If’ ह्या कवितेचे स्वैर रुपांतर. इंग्रजी भाषेतल्या काही कविता अशा आहेत की ज्या अनेकांनी वाचल्या, म्हटल्या आहेत. यू-ट्यूबवर सर मायकेल केन (The Prestige, Inception, A bridge too far), पिअर्स ब्राॅसनॅन, डेनीस हूपर (Apocalypse Now), हार्वे किटेल (Red Dragon, जुना True Grit) ह्या मंडळींनी त्याचं सुरेख वाचनही केलं आहे, ते ही पहा… किपलिंगची मूळ कविता इंटरनेटवर आहे, त्यामुळे ती इथे देत नाही.

माणसानं कितीही अवघड परिस्थितीत स्व:चं भान कसं राखावं हे ह्या कवितेत फार चांगल्या पध्दतीनत आलं आहे. मोठ्या माणसाची गुणवैशिष्ट्यं काय आहेत हे ही ह्या कवितेत आहे. मी मधनंमधनं अशा काही कविता वाचतो. मोठ्या आवाजात वाचतो आणि माझा तोल मला सापडतो. त्यातलीच एक ही कविता… अधिक ह्याविषयी काय लिहू?

If — जर

जर, सगळे डोकं फिरल्यासारखे करताहेत, तुला दोष देताहेत
आणि तरीही तू शांत आहेस

जर, तुझा तुझ्यावर विश्वास आहे पण लोकांचा तुझ्यावर नाही,
आणि, तरीही तू लोकांना दोष देत नाहीस

जर, तू वाट पाहू शकतोयस, पण वाट पहाताना थकत नाहीस,
तुझ्याशी सगळं जग खोटं बोलतंय पण तू त्यांच्याशी नाही,

जर, सारे तुझा द्वेष करताहेत पण तुझ्या मनात राग नाही
तू फार बरा नाहीस, किंवा सध्या फार शहाण्यासारखा बोलतही नाहीस….

जर, तू स्वप्न पाहू शकतो आहेस पण त्या स्वप्नाचा पगडा तुझ्यावर नाही,
तू विचार करतो आहेस, पण फक्त विचार करत बसणं हा तुझा उद्देश नाही

जर, तू जय आणि पराजयाला सारखाच भिडतोयस;
त्या दोन्ही गोष्टींची किंमतही तुझ्या लेखी सारखीच आहे

जर, तुझ्याकडे तुझेच खरे शब्द ऐकण्याची शक्ती आहे,
आणि चलाख मूर्खांनी तेच शब्द फिरवलेले ऐकण्याचीही ताकद आहे

जर, तू सर्वस्व दिलंस अशा गोष्टी संपूर्ण उध्वस्त झाल्याचं पाहू शकतोस,
अन् पुन्हा वाकून, कष्ट करून ते उभं करण्याची जिद्दही आहे तुझ्यात

जर, तू आयुष्यात कमावलेलं सगळं, अगदी सगळं
एका खेळीत पणाला लावू शकतोस, अगदी एका खेळीत
आणि, ते हरून पुन्हा नव्यानं सुरुही करू शकतोस
आणि, तरीही तुझ्याकडून त्याविषयी चकार शब्द निघत नाही

जर, सगळं संपल्यावरही तू जिद्दीनं, पूर्ण ताकदीनं लढत रहातोस
अगदी शेवटपर्यंत काम करत रहातोस, बिलकुल दमत नाहीस
तुझ्यात ताकद राहिलेली नसतानाही तू किल्ला लढवत रहातोस,
आणि, तुझं मन म्हणत रहातं “लढ बेटा, लढ!”

जर, तू लोकांमध्ये राहूनही तुझी तत्वं सोडत नाहीस,
राजाबरोबर चालूनही लोकांशी संपर्क ठेवून असतोस,

जर, तुझे मित्रं किंवा कट्टर शत्रू तुझं वाकडं करू शकत नाहीत
तुझ्या लेखी सगळे महत्वाचे आहेत पण अती-महत्वाचं कुणीही नाही

जर, मिनिटभर लोकांवर टीका करण्याऐवजी किंवा उणीदूणी काढण्याऐवजी
साठ पूर्ण सेकंदं काम करणं महत्वाचं आहे असं तू मनापासून मानतोस,
तर,
तर, हे सारं जग तुझं आहे, बेटा, ह्या जगाचं सगळं सगळं तुझ्याकडे आहे
आणि,
आणि, आणखी काय हवं बेटा, ह्याचमुळं तू खरा ‘माणूस’ आहेस बेटा, ह्याच मुळे …..

ह्याच मुळे तू खरा माणूस आहेस बेटा, ह्याचमुळे!

मूळ कवी : रुडयार्ड किपलिंग — मुंबईत जन्म झालेला पण एक जगद्विख्यात कवी..

चांगल्या कविता समजून सांगायच्या नसतात. समजून घ्यायच्या असतात. समजल्या तर समजल्या. नाही तर नाही. त्याचं हे स्वैर रूपांतर तुमच्यासाठी...

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.