डिलाईट चे दिवस

डिलाईट विद्यापीठ
विस्मृतीत गेलेला काळाचा एक तुकडा ..

खूपदा इतिहासाचे काही तुकडे गायब होतात. समाजाचा स्मृतीभ्रंशच तो. राजीव सान्यांनी आपल्या “सुलटतपासणी” मध्ये डिलाईट चा उल्लेख केला आणि अशा आठवणींच्या पलिकडे गेलेल्या एका कालखंडाच्या आठवणी उचंबळून आल्या. समाजाचं मन घडवताना विविध संस्था जशा काम करतात तशा काही अनौपचारिक सामाजिक प्रक्रियाही खूप काही करून जातात. महाराष्ट्रात तर ह्याबाबतची खूपच मोठी परंपरा होती. सध्या मात्र अशा प्रक्रिया ठप्प होण्याचा किंवा मुद्दाम त्या करण्याचा काळ आहे. अशाच एका छोट्या काळतुकड्याविषयी…

डिलाइटच्या पायरीवर पहिल्यांदा अडखळलो तो दिवस मला स्पष्ट आठवतो आहे.

डेक्कन जिमखान्यावर गुडक चौकातलं “कॅफे डिलाइट” हे एक रेस्टाॅरंट. थोडं जुन्या धाटणीचं. फार चकचकीतपणा नसलेलं. साधं. बसकं. गुडलक चौकातून फर्गसन काॅलेजकडे निघालो की सध्याच्या वाडेश्वरच्या थोडं अलिकडे उजव्या बाजूला एक भाजीवाला होता. आत्ताचं सागर आर्केड आहे तिथं. त्या भाजीवाल्याचा पसारा मोठा होता. छोट्या मोठ्या टोपल्यांमध्ये भाजी मांडून ठेवलेली असे. डेक्कन, प्रभात रोडच्या चोखंदळ स्त्रिया आणि क्वचित पुरुष मंडळी तिथे भाजी घ्यायला यायची. अगदी सुनिताबाई सुध्दा गाडी कडेला लावून भाजी घ्यायला गाडीतून उतरायच्या. पु.ल. गाडीतच बसून असायचे. त्यांची नजर झेलायला मग आम्ही धडपडायचो. नजरानजर झाली की ते प्रसन्न हसायचे. संध्याकाळी तर तिथे चांगलीच गर्दी असायची.

दुकानाला लागूनच एक भिंत होती. त्याच्या समोरच्या बाजूला डावा कोपरा राजू पानवाल्याचा. उजवीकडे भाजीचं दुकान आणि त्याला लागूनची एक सलग कमी उंचीची लांब भिंत. त्या भिंतीला लागून सायकल स्टॅंड सारख्या एकावर एक, दोन, तर क्वचित तीन-तीन सायकली एकमेकावर टाकलेल्या असायच्या. सलग एका ओळीत.. आमच्याकडे मुख्यत: सायकलीच असायच्या. त्या सायकलींवर आपली सायकल जवळजवळ टाकायची आणि सरळ चालत एक छोटी पायरी चढून आतमध्ये यायचं.

त्या पायरीची गंमत होती. नवीन माणूस तिथे थोडा अडखळायचाच. सलग चालत येताना इतकी छोटी पायरी लोकांच्या लक्षात यायची नाही. अडखळायलाच व्हायचं.

ती पायरी ओलांडून डावीकडे आलं की डिलाईटचा मुख्य भाग लागायचा. तिथे काऊंटर. मालक भटसाहेब तिथे बसायचे. ह्या मुख्य भागाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन गार्डन्स. दोन्हीकडे ताडपत्री टाकल्यासारखा मांडव घातलेला. त्या मांडवावर आणि जवळच्या भिंतीवर वेली पसरलेल्या. गारवेलासारख्या. ह्या दोन्ही गार्डन्समध्ये पाच-सहा टेबलं टाकलेली. भोवती चार-चार खुर्च्या. कशाही ठेवलेल्या. अस्ताव्यस्त.

मधला भाग कौलारू छपराचा आणि जरा नीटस. जी माणसं खरंच काही खायला, चहा-काॅफी प्यायला यायची ती तिथे बसायची. त्याच्या आत थोडी अंधारी चार टेबलांची जागा आणि डाव्या बाजूला सपोज टू बी फॅमिली रूम. बरोबर मैत्रीण असल्याशिवाय तिथे बसायचं नाही असा आमचा अर्थातच संकेत होता. भटसाहेब तसं आम्हाला कधी म्हणाले नाहीत पण तो संकेत आम्हा सर्वांनाच नुसता माहीत होता असं नव्हे तर मान्य होता. पंधरा-वीस जणांच्या घोळक्यात असताना आपली मैत्रीण आली की आमच्यातला तिचा मित्र निमूट उठायचा आणि फॅमिली रूममध्ये जाऊन बसायचा. मग तिथे कुणीही जाऊन डिस्टर्ब करायचं नाही. हा ही तिथला संकेतच. प्रत्येकाच्या खाजगीपणाचा आदर हा तिथे असाच अंगात भिनलेला.

ऐसपैस पसरलेल्या, एखाद्या घराचा तोंडवळा असलेल्या डिलाईटला मुळातच आटोपशीर आखीव-रेखीवपणा नव्हता. मोकळी-ढाकळी आपुलकीची रचना होती. टेबलांची अडचण नव्हती. कॅन्टिनचा फील होता पण त्या छोट्या जागेतच एक विस्तीर्ण अवकाश होतं. संपूर्ण जगाचं भान होतं.

डिलाईट आजोळसारखं होतं. जणूकाही आजोबा आराम खुर्चीत बसलेले आहेत. आजीचं निवडणं, आवरणं चालू आहे. नातवंडं खेळताहेत. दंगा चालू आहे. ऐसपैस जागा आहे. विहीर आहे. झाडं आहेत. नेम धरून चिंचा-आवळे पाडली जात आहेत. लहान मोठ्यांकडून गोष्टी ऐकताहेत. नाही पटल्या तर प्रश्न विचारताहेत. स्वार्थाचा लवलेश नाही, डावपेच नाहीत. पण शिकणं तुफान चालू आहे.

प्रत्येक गोष्ट विकायला काढली गेली नव्हती तेंव्हाचा तो काळ. बाजार घरादारात, मनात, ताटात पोचलेला नव्हता. देवघरात, नात्यात उतरायचा होता. किमतीच्या आकड्यातून प्रत्येक गोष्ट पाहिली जात नव्हती. जग मोकळं होतं. दिसायला साधं होतं पण मनानं बळकट समृध्द होतं. सगळं आहे पण काही नाही अशी भावना नव्हती. बटबटीत हावरटपणा हवेत तो पर्यंत आलेला नव्हता. अशा ऐसपैस, मोकळ्या, उत्सुक दिवसात डिलाईट विद्यापीठात मी प्रवेश घेतला आणि सगळंच बदललं.

सत्त्याहत्तर सालच्या मे महिन्याची एक दुपार होती ती. नेहमीसारखीच. तेंव्हा एका टेबलाभोवती सात-आठ जण बसले होते. थोडी जुजबी ओळख झाली आणि तिथल्या गोष्टी ऐकत पुढचे दोन-तीन तास कसे गेले कळलंच नाही. दोन-तीन तास कशाला नंतरची तीन-चार वर्षच कशी गेली कळलं नाही.

सध्या जशी दहावीची परिक्षा महत्वाची असते तशी तेंव्हा अकरावीची असायची. त्यानंतर मग चार वर्ष काॅलेज. त्यात त्या वर्षी बदल झाला होता म्हणून १२ वी झालेली नवी बॅच आणि एफवाय झालेली जुनी बॅच अशा दोन बॅचेस एकाच वेळी आल्या. मुलं दुप्पट झाली पण मेडिकल किंवा इंजिनियरींगच्या जागा तितक्याच राहिल्या. तेंव्हा खाजगी काॅलेजेस नव्हती. सगळी फक्त सरकारी. त्यामुळे मुलांमध्ये अनिश्चितता होती. त्यातून चीडचीड सुरू होती. आमच्यावर अन्याय होईल असं वाटत होतं. त्याच्या विरोधात काहीतरी करावं असं वाटायला लागलं होतं. वातावरण तापलं होतं. काॅलेजा-काॅलेजात, कॅन्टिनमध्ये मिटींग्ज सुरू झाल्या होत्या. सर्वांना भेटण्याची निरोप देण्याची दुसरी जागा नव्हती. डिलाईट हीच भेटण्याची, निरोप-देण्याघेण्याची जागा होती.

मी डिलाईटला पोचलो त्यावेळेस दिल्लीत इंदिरा गांधींचा पराभव होऊन मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाल्याला अवघे दोन-तीनच महिने झाले होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती. पहिला रोमॅन्टिसीझम आटायला लागला होता. आधी जंजीर, नंतर दीवार मधून अमिताभ त्याचा सगळ्या जगावरचा राग व्यक्त करत होता. शोलेमधून पडद्यावर काय काय होऊ शकतं ह्याचं दर्शन झालं होतं. इंडिया टुडेनी नव्या युगाची पत्रकारिता देशासमोर आणली होती. आणीबाणीतून स्वातंत्र्यानंतरच्या एका मोठ्या खळबळीतून देश बाहेर येऊन शोध घेत होता. मुंबईला ग्रंथाली वाचक चळवळ आकार घेत असताना दलित मन व्यक्त व्हायला लागलं होतं. घाशिराम कोतवाल, बाईंडरनं महाराष्ट्र हडबडला होता. सामना, सिंहासन, जैत रे जैत नी मराठी सिनेमा नवी क्षितीजं शोधत होता. देशात काहीतरी वेगळं होणार आहे असं वाटायला लागलं होतं. नवे वेध लागत होते. महाराष्ट्र आणि सारा देशच कूस बदलत होता.

मेडिकल आणि इंजिनियरिंगसाठी जागा दुप्पट करा, कारण विद्यार्थी दुप्पट झाले आहेत अशी आमची त्यावेळची मागणी होती. मी त्याच वयाचा असलो तरी मला स्वत:ला ह्या आंदोलनाचा काही फायदा होईल, जागा वाढल्या म्हणजे मला प्रवेश मिळेल असा काहीच प्रकार नव्हता. पण मी ओढला गेलो. त्या आधी भाग घेतला नव्हता तरी देशातलं आंदोलनाचं वातावरण पहात होतो. आमच्या एस.पी. काॅलेजच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांना घोषणा देताना पकडलेलं पाहिलं होतं. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून देशभर चाललेल्या वातावरणाची कल्पना येत होती. विविध प्रकारचे राजकीय विचार समोर येत होते.

माझा जन्म कट्टर सदाशिव पेठेत झाला असला तरी लहानपणी एकही दिवस मी संघाच्या शाखेवर गेलो नाही. आई-वडिलांनी संध्याकाळी खेळायला महाराष्ट्र मंडळात घातलं होतं. त्यामुळे शाळेतून आलं की तडक मंडळात जायचो. त्यामुळे संघाचे असे संस्कार झाले नाहीत, जरी माझ्या घरी-दारी संघाचे स्वयंसेवक, प्रचारक होते. माझे सख्खे मोठे काका डाॅ.वि.रा. करंदीकर संघाचे. त्यांनी लिहिलेलं “तीन सरसंघचालक” हे पुस्तक हे संघाच्या पहिल्या काळाचं सर्वोत्तम आणि सर्वात समर्पक इतिहासलेखन आहे असं मानतात. त्यांच्याबरोबर माझ्या वडिलांकडचे जवळजवळ सगळे जण संघविचारांचे. माझ्या आईकडचे अगदी संघाच्या विचारांचे नसले तरी त्यांचा झुकाव तिकडेच होता. मात्र अमेरिका, इंग्लंड इथे काय चाललं आहे, उद्योग क्षेत्रात काय काय चाललं आहे ह्याच्याकडे बारकाईनं पहाणारी ती मंडळी होती. माझी आई शाळेत शिक्षिका, वडीलही ध्येयवादी अनाथ विद्यार्थी गृहाचे (सध्याचं पुणे विद्यार्थी गृह) आजीव सभासद आणि त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक होते.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भरभराटीच्या काळात पुण्यात एका जागरूक शिक्षकाच्या घरी माझं बालपण गेलं. वसंत व्याख्यानमालेतली भाषणं, निवडणुकांच्या काळातली राजकीय भाषणं मी तेंव्हा अमाप ऐकली. यशवंतराव चव्हाण, शिवाजीराव भोसले, पु.ल. देशपांडे, सेतू माधवराव पगडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांची भाषणं मला आठवताहेत. दर आठवड्याला मार्मिक आणायला मला बाबा आवर्जून पाठवायचे. ते स्वत: कट्टर मराठी अभिमानी होते. मार्मिक बरोबर सोबत साप्ताहिक, साहित्यावरचं ललित, त्यातलं ठणठणपाळ सदर, दर महिन्याला किमान एक मराठी सिनेमा, दर वर्षी सुधीर फडक्यांचं माझ्या नूतन मराठी शाळेच्या आवारातलं गीतरामायण, सवाई गंधर्व, भरत नाट्य मंदीरातली वसंत कानेटकरांची नाटकं, संगीत नाटकं ह्यांनी माझं बालपण समृध्द झालं. अशा वातावरणात शिवसेनेचा उदय, नक्षलवादी चळवळ, गुजरातमधलं नवनिर्माण आंदोलन, जयप्रकाश नारायणांची आणीबाणीतली भाषणं, बाबा आढावांचं “एक गाव एक पाणवठा” हे सगळं पहात असताना मनाची चांगली मशागत होत गेली होती. नवं ऐकायला, पहायला आणि काही करायला मन तयार होतं.

तशा अवस्थेतच मी डिलाईटची पायरी चढलो.

“मेडिकल इंजिनियरींग” च्या जागा वाढवा ही आंदोलनाची मागणी असली तरी ही मुलं तेव्हढ्यापुरता विचार करत नाहीयेत हे अगदी पहिल्याच दिवशी लक्षात आलं. “पुणे विद्यापीठ विद्यार्थी संघटना” हे संघटनेचं नाव होतं. विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलणं हा उद्देश होता.

सर्वांचं भेटण्याचं ठिकाण मात्र होतं डिलाईट. निरोप देण्याचं, घेण्याचं काम तिथं चालायचं. आंदोलनाबाबत समजलं की मुलं, मुली तिथं यायच्या, ओळखी व्हायच्या. मिटींगच्या वेळा, तारखा, जागा ठरायच्या. त्या त्या काॅलेजेस मध्ये जाऊन मुला-मुलींना आंदोलनासाठी तयार करण्याचं काम चालू असायचं. शिक्षणमंत्र्यांना निवेदन देणं, मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणं, मोर्चे, धरणं ह्या सगळ्यातून दोन-चार महिन्यातच सरकारला जागा वाढवून द्याव्या लागल्या. संघटनेचा पहिला विजय झाला.

हे आंदोलन संपतंय न संपतंय तोच एक दिवस डिलाइटला भराभरा नावं घेण्याचं काम सुरू झालं होतं. लोणावळ्याला शिबीर आहे, कोण कोण येणार ह्याची चर्चा होती. मी नाव दिलं. शुक्रवारी निघायचं. रात्री मुक्काम करायचा. शनिवार-रविवार रहायचं आणि रविवारी रात्री उशीरा परत यायचं असा काहीतरी कार्यक्रम ठरला. मला शिबीर म्हणजे काय, कसं असतं, काय असतं काहीच माहीत नव्हतं. उशीराच्या लोकलनं निघालो. प्रत्येकानी काॅन्ट्रिब्यूशन नी जायचं. तीस चाळीस जण असू आम्ही. गप्पा मारत, गाणी म्हणत लोणावळा कधी आलं कळलंच नाही. एक गोष्ट त्याच दिवशी शिकलो की सगळे जरी २०-२५ जण असले तरी तिकिटं फक्त आठ-दहाच काढायची असतात. तिकीट चेकर आला की तिकीटं एकमेकांना द्यायची आणि सटकायचं. आणि, चळवळीत असं करणंच योग्य आहे कारण आपल्याला ही व्यवस्थाच उखडून टाकायची आहे असेच नंतर संस्कार झाले. अजून एक संस्कार त्यावेळी झाला. आपल्याला काहीतरी क्रांतिकारक करायचं असेल तर सगळी बंधनं झुगारली पाहिजेत. सगळी. घरची, दारची, संस्कारांची, सगळी. ते बंधन झुगारण्याचं चिन्ह म्हणून आयुष्यातली पहिली सिगरेटही त्याच छोट्याशा प्रवासात ओढायला शिकलो.

पहिल्याच दिवशी डिलाईटला गेलो तेंव्हाच एका टेबलाभोवती पाच-सातजण बसले असले तरी एक किंवा दोन सिगरेटी एकमेकांत फिरवत जोरजोरात चर्चा चाललेली होती. सिगरेट पीणं हे निश्चितच मर्दूमकीचं, काहीतरी ग्रेट केल्याचं लक्षण होतं. मी डिलाईटला गेल्या गेल्या आमच्यातल्या मोठ्या मुलांच्या सिगरेट ओढण्याच्या लकबी पहायचो. मनात इच्छा निर्माण झालेली होतीच.

“आता तू लिबरेट झालास” पहिली सिगरेट पेटवतानाच प्रवीण म्हणाला. थोड्याच वेळात शिबीराच्या ठिकाणी पोचलो.

त्या शिबीराची आठवण मात्र मनातून कधीच जाणार नाही.

लोणावळ्याचा शांत परिसर. प्रत्येकाच्या अंथरूण-पांघरूणाची साधी पण चांगली सोय. सकाळी उठलं की खोलीबाहेर चहा. मग गरमागरम नाष्टा. पहिलं सत्र घ्यायचे डॉ. वि. म. दांडेकर. अर्थशास्त्रावर. सकाळी ९ ते १ पर्यंत. विषय अर्थातच अर्थशास्त्र. “भारतात गरिबी का आहे? कशी आहे?” ह्याविषयावर. जेवणानंतर फर्गसनचे कोगेकर सर “राज्यशास्त्र” शिकवायचे. शिकवायचे म्हणजे काय तर बोलायचे. आम्ही शांतपणे ऐकायचो. मधून मधून प्रश्न विचारायचो. आंतरराष्ट्रीय किर्तीचे अर्थतज्ञ तीस-चाळीस मुलांसमोर दोन दिवस चार चार तास देशाच्या आर्थिक प्रश्नांवर बोलताहेत. जेवणानंतर दुपारच्या सत्रात राज्यशास्त्राचे दुसरे नामवंत प्राध्यापक आम्हाला गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद सांगताहेत. प्रश्नोत्तरं होत आहेत. रहाण्याची उत्तम सोय आहे. जेवणाची आहे. दोन दिवस हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. कमाल आहे की नाही?

पहिल्या दिवशीची सत्रं संपली. दांडेकर, कोगेकर आपापल्या खोल्यात गेले. आम्ही थोडे फिरून आलो. चर्चा, वादविवाद तर चालूच होते. आपल्याला काय पटलं, काय पटलं नाही ह्यावरच चाललेलं होतं. सिगरेटींचं अग्निहोत्रं होतंच. त्यातच रात्री जेवणाच्या वेळेस पुण्याहून अशोक आला.

काॅम्रेड अशोक मनोहर. त्यानी कामगारांची कशी पिळवणूक होते आहे, शेतमजूर कसे नाडलेले आहेत ह्यावर फार अप्रतिम मांडणी केली. त्याचा ठसा माझ्या मनावर अजून आहे. इतकं विषयाला वाहिलेलं, बांधिलकी असलेलं, प्रामाणिक बोलणं मी पूर्वी ऐकलेलं नव्हतं. त्यात बोलण्यात वन-वे नव्हता. प्रश्नोत्तरं होती. मला आठवतंय तिथल्या गच्चीवर मी पहिल्यांदा चर्चा सुरू असतानाच सूर्योदय पाहिला.

नंतर कित्येकदा रात्रभर जागून चर्चांचे फड झाले. मराठवाड्यात नंतर फिरताना तर जागरणाशिवाय एक रात्रही गेली नाही. पण त्या दिवशीचा सूर्योदय मात्र एक नवी पहाट देऊन गेला.

अशोकचं मी समजू शकतो. तो “सर्व श्रमिक संघटनेचा” कार्यकर्ता होता. आपल्या राजकीय विचारांचा प्रसार व्हावा, आपल्या संघटनेत नव्या रक्ताची भरती व्हावी असा त्याचा उद्देश असणार पण वि. म. दांडेकर किंवा ना.वा. कोगेकर ही मंडळी हा उद्योग का करत होती? त्यांना काय मिळत होतं? कोण कुठल्या तीस-चाळीस मुलांना शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी अर्थशास्त्र राज्यशास्त्र शिकवावं असं त्यांना का वाटत होतं? ह्याचा थांग लागत नाही. कुठली तरी आग असणार, कुठली तरी तहान असणार, कारण त्याशिवाय हे होणार नाही. एक खरं की त्यांची “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल इकाॅनाॅमी” नावाची संस्था होती. त्या तर्फे ते अशी शिबीरं घ्यायचे. पण का? आणि, कशासाठी?

दांडेकरांची आणखी एक गंमत आहे.

एक दिवस आधी डिलाईटला भेटून, ठरवून आम्ही चार-पाच जण दांडेकरांकडे गेलो. म्हणालो “सर, आम्हाला इकॉनॉमिक्स शिकायचंय”. आपल्या लांब दाढीतून हात फिरवत, डोळ्यांनी रोखून बघत ते आम्हाला म्हणाले “का रे?” मग आम्ही म्हणालो, “आम्ही कुणी सायन्सचे, तर कुणी काॅमर्सचे विद्यार्थी आहोत. अर्थशास्त्र महत्वाचं आहे. ते सर्वाच्या मुळाशी आहे. म्हणून ते शिकायचं आहे” मग ते म्हणाले “किती जण आहात तुम्ही? असं करा ज्यांना ज्यांना अर्थशास्त्र शिकायचं आहे त्यांनी एका पानावर “रूपया” ह्या विषयावर निबंध लिहा आणि शनिवारी दुपारी ४ वाजता तो घेऊन माझ्याकडे या.”

झालं. डिलाईटला ही बातमी आणखी पसरली.

पुढच्या दोन-तीन दिवसात आम्ही इकडून तिकडून माहिती गोळा करून, काहींनी स्वत:च्या कल्पना लढवून निबंध लिहिले. आम्ही साधारण १०-१२ जण असू. बरोब्बर चारच्या ठोक्याला त्यांच्याकडे पोचलो. एक एक जण उठून त्यांच्याकडे आमचे निबंध दिले. शांतपणे, दाढीवरून हात फिरवत, मधून हसत त्यांनी ते वाचले. मधेच कुमुदिनी दांडेकर, त्यांच्या पत्नी ज्या स्वत: एक मोठ्या लोकसंख्याशास्त्रज्ञ होत्या त्या आमच्या सर्वांकडे नजर टाकून गेल्या. मग एक एक करून त्या निबंधात आम्ही जे लिहिलं होतं त्यावर दांडेकर काही काही बोलत राहिले. समजावत राहिले. काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली. आमच्या मनात त्यातून अर्थशास्त्राविषयी एक विलक्षण आकर्षण निर्माण झालं. साधारण एक तास झाला असेल. वेळ कसा गेला कळलंच नाही. मग आतून कुमुदिनी दांडेकर एका ट्रे मध्ये साजुक तुपातला शिरा भरलेले काचेचे बाऊल्स घेऊन आल्या. सर्वांनाच भूक लागली होती. दांडेकरांचं पुढचं बोलणं ऐकत ऐकत आम्ही तो शिराही फस्त केला.

एक आंतरराष्ट्रीय किर्तीचे अर्थतज्ञ, गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संचालक आम्हाला मन लावून शिकवतात काय, त्यांच्या पत्नी ज्या स्वत: एक विदुषी आहेत त्या प्रेमानं आम्हाला शिरा देतात काय, आज सगळंच अदभुत वाटतं आहे. त्यांनी हे का केलं असावं? तसं करण्यामागे त्यांची काय प्रेरणा असावी?

महाराष्ट्राचं प्रबोधनयुग हे इतिहासातलं एक गौरवशाली पान आहे. अल्लाउद्दिन खिलजी आल्यानंतर समाजाला सावरायचं काम संतांनी केलं. समाजाची मशागत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी भूमी तयार करून दिली. नंतर स्वराज्याचा झेंडा देशभर नेता नेता मराठी समाजाला एक एक्सपोजर मिळालं. त्यानं मराठी मन अधिक व्यापक झालं. त्यातच इंग्रजी शिक्षणामुळे जगाची आणखी ओळख झाली. मग महात्मा फुल्यांपासून ते महाराष्ट्राच्या स्थापनेपर्यंत, किंवा त्यानंतरही साधारण जनता पक्षाचं सरकार पडेपर्यंत महाराष्ट्रात “शहाणे करून सोडावे सकळ जन” अशी एक प्रवृत्ती होती. दांडेकर महाराष्ट्राच्या त्याच प्रबोधन परंपरेतले. समाज शहाणा झाला पाहिेजे म्हणून धडपडणारे. म्हणून स्वत:चा वेळ, स्वत:चा पैसा खर्चून मुलांना अर्थशास्त्र शिकवताना त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही.

दांडेकरांच्या अर्थशास्त्राच्या नादाला लागून आम्हा सर्वांनाच अर्थशास्त्राची ओळख झाली. आमच्यातल्या काहींनी नंतर आयुष्यभर त्याची कास सोडली नाही. असं कित्येकांचं झालं. त्यावेळी एखाद्या विषयाच्या बाबत जी उर्मी निर्माण झाली ती नंतर आयुष्यभर टिकली. जसं अर्थशास्त्राचं तसंच चित्रपटांबाबतही झालं. सतिशच्या नादी लागून डिलाईटमधून उठून फिल्म इन्स्टिट्यूटला जाऊन चित्रपट बघण्याची आम्हाला सवयच लागली.

एकदा अशीच मजा झाली.

आम्ही दोघं तिघं जण रोज संध्याकाळी डिलाईटवर जमायचो आणि साधारण सातच्या सुमारास इन्स्टिट्यूटच्या थिएटरमध्ये जवळजवळ रोज जायचो. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी तिथे रोज एक चित्रपट दाखवला जायचा, त्याची नोटीस सकाळी तिथल्या बोर्डावर लागायची. ती वाचून समर किंवा रामनाथ असं कुणीतरी सांगायचं की आज “फेलिनी आहे” किंवा सांगायचे “आज एन्टिनियोनीचा रेड डेझर्ट आहे. चुकवू नकोस”. आम्ही मग सायकली हाणत किंवा पायी इन्स्टिट्यूटला जायचो. पोटात भूक लागलेली असायची, पण पैसे नसायचे. मात्र कुणीतरी पैसेवाला निघालाच की मग लाॅ काॅलेजच्या समोर एका खोपटात आमची मिसळ खाण्याची जागा होती. तिथे खायचं आणि पुढे जायचं असा आमचा शिरस्ता होता.

एके दिवशी असंच मी, सतीश आणि दोघं-तिघं होतो. सिनेमा सुरू होऊन पंधरा-वीस मिनिटं झाली असतील. बहुधा आन्द्रे वाझदाची “गेट्स टू पॅरेडाईज” असावी असं अंधुकसं आठवतंय. चित्रपटात गुंतलो होतो. तेवढ्यात दिवे लागले.

नायर आणि दोघे तिघे स्क्रीनपाशी आले आणि म्हणाले “आऊटसायडर्स स्टॅण्डअप”. आम्ही निमूटपणे उभे राहिलो. “गेट आऊट, देन कम विथ मी” नायर दरडावून म्हणाले. आम्ही हादरलो. आम्हाला वाटलं आता काही खरं नाही. त्यांच्या मागोमाग मग निमूटपणे गेलो. त्यांच्या ऑफीसमध्ये उभे राहिलो. “तुम्हाला पोलीसातच द्यायला पाहिजे. काहीही करता, कुठेही घुसता”, असं काहीतरी बोलत बोलत त्यांनी सरळ पोलिसांनाच फोन लावला. इन्स्टिट्यूटमध्ये जगभरातले सिनेमे दाखवायचे. त्यातले काही सेन्साॅर न झालेले आणि नग्न दृश्य असलेलेही असायचे. तसं काहीतरी बघायला आम्ही गेलो असू असं त्यांना वाटलं असावं.

पोलीस येईपर्यंत नायरांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली. “क्या देखते हो यहॉं?”. कुणी काहीच बोललं नाही. आम्ही जाम घाबरलो होतो. त्यांनी पुन्हा दरडावलं तर बहुतेक सतिशच म्हणाला “आम्हाला सिनेमे पहायला आवडतात. त्यावर आम्ही नंतर चर्चा करतो”. “पण कुठले? कुणाचे? काय रे, तुझा आवडता डायरेक्टर कोण?” ह्यावर सतीश म्हणाला “आयझेनस्टीन. सर्जी आयझेनस्टीन.” नायरनी जरा आश्चर्यचकित होऊन विचारलं “आयझेनस्टीन? विच फिल्म ऑफ हिम?” सतीशला मुळीच वेळ लागला नाही, म्हणाला “बॅटलशिप पोटेमकीन”. मग नायरांनी त्यांचा मोर्चा दुसरीकडे वळवला. त्यानं असंच काहीसं उत्तर दिलं. मला वाटत होतं मला काही विचारूच नये. मी नजर चुकवत इकडे-तिकडे पहात होतो. “नाऊ यू. तुम्हारा फेवरिट डायरेक्टर कौनसा? तुला कोण आवडतं?” नायर म्हणाले. मी त्यांच्याकडे बघतच नव्हतो. त्यांनी मला विचारल्याचं कळलंच नाही. मग सतीशनंच हातानं ढोसलं.

मी भानावर आलो. म्हणालो “घटक. ऋत्विक घटक.” नायरांनी तडक विचारलं “घटक? उनका कौनसा?” मी म्हणालो “मेघे ढाका तारा”. आमची उत्तरं ऐकल्यावर नायरांचा चेहराच बदलला. मग त्यातलं काय? कसं? आणखी कोण चांगले दिग्दर्शक आहेत हे नायरच आम्हाला सांगत राहिले. एव्हाना त्यांचा राग निवळला असावा. त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं आणि चक्क आमच्यासाठी चहा मागवला. पोलीस आले तरी त्यांना परत पाठवलं.

त्यावेळी नायर अर्काईव्ह्ज बघत होते. ते तिथे का आले? त्यांना कुणी तक्रार केली होती? काही काही माहीत नाही. पण नायर आमच्यावर इतके खूष झाले की त्यांनी आम्हाला आमचा एक फिल्म क्लब काढायला लावला. पुणे विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा फिल्न क्लब. विद्यार्थी संघटनेचं काम करता करता आम्ही सिनेमे दाखवायचो. रात्र रात्र त्याच्यावर चर्चा करायचो. फेस्टिवल्स करायचो. नंतर मग भारतीय चित्रपटांचा इतिहास ह्यावर प्रदर्शनही भरवलं. सतीश, अजय वगैरे तर आहेतच पण ह्या सगळ्यातून कित्येकांना चित्रपट कसा पहायचा हे समजलं. त्यातूनच नंतर “आशय फिल्म क्लब” निघाला. सुरूवातीला चित्रपटांची अवजड रिळं घेऊन भरूचा म्हणून कॅम्पात एक जण प्रोजेक्शनिस्ट होते त्यांच्याकडे जायला लागायचं. ते ही सायकलवरून जायचो. नंतर मग आशयसाठी पु.ल. नी मदत केली. आमच्या चार्ली चॅप्लीन महोत्सवालाही ते स्वत: आले होते.

आम्हाला मदत करावी असं तेंव्हा पु.ल. ना का वाटलं असावं? नायरांनी आमच्यात काय पाहिलं असावं? कुठलीही पार्श्वभूमी नसताना, साधा फिल्म क्लब रजिस्टरही नसताना त्यांनी आम्हाला का मदत केली असावी? दर महिन्याला दोन-दोन, तीन-तीन चित्रपट दाखवून, त्यावर चर्चा घडवून आणून आम्ही कितीतरी मुला-मुलींना दृष्टी दिली असेल. त्यानं समाजात काय प्रकारचं सामाजिक भांडवल निर्माण झालं असेल? ह्या प्रकारच्या उपक्रमांमधून समाजाचं कसं पोषण होत असेल? त्याला कुणी स्पाॅन्सरशीप द्यावी असं आम्हाला का वाटलं नसेल? तशी गरज का निर्माण झाली नसेल?

ह्या अशा गोष्टी चालू असताना संघटनेची त्या त्या महाविद्यालयात छोटी छोटी आंदोलनं चालूच होती. त्यातून मिळणारे विजय साजरे करत आमची संघटना बांधणी आम्ही करतच होतो. नवनव्या विद्यार्थ्यांना भेटत होतो. आमच्यात ओढत होतो. विद्यार्थ्यांना वर्गलढ्यासाठी तयार करत होतो. ह्याही सर्व घडामोडींचं केंद्र कॅफे डिलाईटच.

त्यावेळी मी एस.पी. काॅलेजमध्ये होतो. अभ्यासाकडे अर्थातच लक्ष नव्हतं. रमण रोज यायचा. सायकल स्टॅण्ड जवळ एक छोट्या उंचीचं झाड होतं. कुठलं ते आता आठवत नाही. पण त्याचा फांद्यांचा पसारा मोठा होता. त्याच्या सावलीत बसून आमच्या चर्चा चालायच्या. तिथेच मला त्यानं “खेड्यातील श्रमिकांनो” हे लेनिनचं पुस्तक वाचायला दिलं होतं. आमची भाषा बदलायला लागली होती. अशोकचं “ऊठ वेड्या तोड बेड्या” नुकतंच वाचून झालं होतं. “उठाव झेंडा बंडाचा” चा जागर करत होतो. संघटनेच्या कलापथकात अण्णाभाऊ साठे, काॅम्रेड अमर शेख ह्यांची गाणी म्हणत आम्ही तेंव्हा पथनाट्याची प्रॅक्टिसही करायचो. “माध्यम” नावाचा आमचा ग्रुप होता. समर आणि माधुरी आम्हाला शिकवायचे. त्याचवेळी एस.पी. काॅलेजमध्ये आम्हाला एक इश्यू आपणहून मिळाला. आणि, आम्ही कामाला लागलो.

एस.पी. काॅलेजनी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांसाठी जो फुकट सायकल स्टॅण्ड होता तो आता सशुल्क केला. दर सेमिस्टर ला म्हणजे सहा महिन्याला फार नाही पण फक्त एक रुपया असा दर ठरवला. झालं. आम्हाला हे पटलं नाही. मुलं फी देतात. सायकलनं येणं हा त्यांचा हक्क आहे मग ती सायकल ठेवण्यासाठी पैसे का द्यायचे? असं आम्हाला वाटलं. आम्हाला हा एक रूपया म्हणजे विद्यार्थ्यांची पिळवणूक वाटली. बैठकावर बैठका सुरू झाल्या. प्राचार्यांना भेटायचो. वाटाघाटी चालायच्या. त्यात गमती जमती व्हायच्या. त्यात आमच्यापैकी एकानं म्हटलं “सायकलला एक रूपया तर घरनं तीन चाकी सायकल आणली तर त्याला किती?” सुपरवायझर चिडले. काहीतरी बोलून गेले. प्राचार्यांनी त्यांना शांत केलं. आम्हाला उचकवण्याचा फायदा कळला. ह्यातनं वाटाघाटींमध्ये काॅलेजला डिफेन्सवर टाकता येतं हे कळलं.

मग दोन-चार दिवसांनी आम्ही घोषणा केली. “सहा महिन्याला सायकल स्टॅण्डला एक रूपया हे आम्हाला मान्य आहे. त्याबाबत बोलायचं आहे”.

ह्या अगोदर एक-दोनदा काॅलेज बंद करून झालं होतं. प्राचार्यांच्या, उप-प्राचार्यांच्या केबिनच्या बाहेर जोरदार घोषणाबाजीही झाली होती. संपूर्ण काॅलेजात प्रभात फेरी, दुपार फेरीही काढून झाली होती. कुठेही तोडफोड केलेली नव्हती, त्यामुळे हळूहळू आम्हाला विद्यार्थ्यांचा पाठिंबाही मिळायला लागला होता. मग एक दिवस काॅलेजात दोन-चार बैलगाड्याही आणल्या. बैलगाड्यामधून मुलं काॅलेजात आली होती. आता ह्या कुठे लावायच्या? ह्याला किती फी असे प्रश्न विचारून काॅलेज व्यवस्थापनाला वैताग आणण्याचं आमचं काम चालूच होतं. वातावरण गरम होतं, तापत होतं.

अशातच आम्ही घोषणा केली की “आम्हाला सहा महिन्याला एक रूपया मान्य आहे. मुलांचं आता शैक्षणिक नुकसान होऊ नये. काॅलेज बंद राहू नये हे आम्हालाही पटतं. काॅलेजलाही त्यावर खर्च असतो हे ही मान्य आहे. फक्त आम्हाला हा एक रूपया हप्त्यामध्ये भरण्याची परवानगी असावी. पाच पैशांचा एक हप्ता. असे वीस हप्ते.”

झालं, काॅलेजला वाटलं मुलं आता दमली, थकली. त्यांनी मान्य केलं. आम्ही पाच पाच पैसे घेऊन मुलांना यायला सांगितलं. शेकडो मुलं पाच पाच पैसे घेऊन आली आणि म्हणाली “आम्हाला पावती पाहिजे. पाच पैशांची पावती.”. झालं, काॅलेज जिद्दीला पेटलं त्यांनी मान्य केलं. शेकडो मुलं रांग लावून उभी राहिली. पावतीवर नाव लिहायचं तर चांगल्या हस्ताक्षरात लिहायचं असा आग्रह धरू लागली. तिथे वेळ घालवू लागली. आसपासच्या काॅलेजमधली मुलं गंमत बघायला यायला लागली. मुलींना उत्साह आला. मुलींना आला म्हणून मुलांना आला. काॅलेज प्रशासनाची चेष्टा झाली. काॅलेजनी एक रूपयाची अट मागे घेतली. आम्ही जिंकलो. संघटनेची पकड वाढली. त्यातूनच पुढे फी वाढीविरूध्द मोठं आंदोलन झालं. आठवडाभर काॅलेजेस बंद होती. प्रचंड मोर्चाही निघाला.

ह्या मोर्चाचंही आमचं एक टेक्निक होतं. संघटनेकडे आता मुलींचा ओघ वाढला होता. मुलींना मोर्चाच्या पुढे ठेवायचं. एक मुलगी असेल तर १०० मुलं येतात. असा अनुभव होता. अत्यंत आक्रमक घोषणा देत पण तोडफोड न करता मोर्चे चालायचे. माॅडर्न काॅलेजमध्ये तर एकदा चुकून एक काच फुटली तर ती आम्ही वर्गणी काढून भरून दिली होती. त्याचाही संघटना वाढीसाठी उपयोग करून घेतला होता.

आंदोलनाच्या बाबतीतल्या सगळ्या चर्चा डिलाईटला व्हायच्या. काय डावपेच लावायचे, काय भूमिका घ्यायच्या ह्याच्या चर्चाही तिथेच चालायच्या. मात्र एखादं आंदोलन एखाद्यानं यशस्वी केलं तर त्याला डोक्यावर घेणं वगैरे अजिबात चालायचं नाही. डिलाईट म्हणजे तुमचा तुमचा ईगो ठेचून देण्याची घाऊक पेढी होती. एखादा जरा स्वत:बाबत बोलायला लागला, काहीतरी आव आणून काही करू लागला की त्याची इतकी चेष्टा व्हायची, हेटाई व्हायची की ज्याचं नाव ते. त्यामुळे तिथे ह्याचं प्रस्थ, त्याचीच चलती असं काही नव्हतं. सगळे समान. सगळे सारखे.

माणसाला त्याच्या तरूण वयात अशी ईगो ठेचून घेण्याची आवश्यकता असते. तू कुणी नाहीस. तू सर्वांसारखाच आहेस. वेगळा असशील, पण तो ही वेगळा आहे. त्याचंही ऐकून घ्यावं लागेल. त्याचंही मत आहे. ते मांडण्याचा त्याला अधिकार आहे. इथे श्रेष्ठ कुणीच नाही. श्रेष्ठ आहे ते सामूहिक शहाणपण हा समज तिथे इतका व्यवस्थित रूढ झाला की त्याचा संपूर्ण आयुष्यभर उपयोग झाला. आज असा इगो ठेचून देण्याची केंद्र कुठे आहेत का? मला तरी माहीत नाहीत.

काही काही विषयांवर आमची आंदोलनं चालू होती. मधनं मधनं मग थिएटर अकॅडमीच्या तीन पैशाच्या तमाशाच्या तालमीला जाणे, समरबरोबर घाशीरामचं लाईट तो कसे करतोय ते पहाणे, गाण्यांच्या मैफिलींना जाणे, रात्र रात्र जागून देशभर चाललेल्या सामाजिक आंदोलनांचा आढावा घेत रहाणे हे सर्व प्रकार चालू होते. हे करता करता हळूहळू आवड ठरत होती. इतक्या विविध गोष्टी पाहिल्यावर आपल्या आवडीचं क्षेत्रं शोधणं सोपं जात होतं.

नंतर आदिवासी भागात फिरताना तिथल्या घोटूलची ओळख झाली होती. घोटूल ही आदिवासी संस्कृतीतील एक महत्वाची गोष्ट आहे. गावातली किंवा पंचक्रोशीतली तरूण मुलं आणि मुलं तिथे एकत्र रहातात. दिवसभर खेळतात. शिकतात. नाचतात. त्या वयात कुटुंबामध्ये तरूण मुलं राहू शकत नाहीत कारण त्यांची पध्दतच वेगळी असते. आवड भिन्न असते. भावविश्व वेगळं असतं हे आदिवासी समाजाला मान्य होतं. म्हणून घोटूल ही संस्था होती. डिलाईट हे आमचं घोटूल होतं. स्वत:चं स्वतंत्र, बंडखोर भावविश्व असलेलं, स्वत:चे नियम वेगळे, मूल्य वेगळी असं असणारं.

त्यामुळेच आमचे विषय फक्त विद्यार्थ्यांपुरते मर्यादीत नव्हते. खरंतर आमच्या कुठल्याच गोष्टींना मर्यादा नव्हती. आम्ही शेतकरी प्रश्नाचाही विचार करत होतो.

त्याचवेळेस शेतकरी संघटनेचं कांदा आंदोलन चाकण परिसरात सुरू झालं होतं. आपण शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी अशी आघाडी केली पाहिजे असा आमचा विचार होता. आम्ही शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला. अर्थात ह्याबाबतीत आमच्या आमच्यात देखील खूप मतभेद होते. ह्या शेतकरी आंदोलनाच्या वर्गीय भूमिकेबाबत आम्हाला शंका होती. हे आंदोलन कुठल्या शेतकरी वर्गाचं आहे, ह्यात शेतमजूराला काय मिळणार अशा शंका होत्या. ह्याबाबतच्या आमच्या रात्र रात्र चर्चा चालायच्या. पण अखेर आम्ही आंदोलनाला “टॅक्टिकल” पाठींबा दिला. एक दिवस पुण्यातली सर्व काॅलेजेस आणि विद्यापीठाचं कामकाज शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून बंद होतं. शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी काॅलेजेस बंद ठेवली होती.

मला आठवतंय, अलका टाॅकीज चौकात “काॅलेज बंद” ची तयारी म्हणून आम्ही एक दिवसाचं धरणं धरलं होतं. सकाळी १० वाजता सुरूवात झाली होती. “आग चहू बाजूनी लागली संसारा”, “सांगा आम्हाला धनाचा वाटा कुठं हाय हो” सारखी गाणी जोरजोरात सुरू होती. प्रत्यक्ष आंदोलनाआधी वातावरण पेटवण्यासाठी पथनाट्यंही केली होती. अकरा-सव्वा अकराच्या सुमारास आम्ही धरणं धरली होती तिथे समोर येऊन एक रिक्षा थांबली. त्या रिक्षातून एक मध्यमवयीन गोल चेहरा असलेले थोडे गोरे गृहस्थ उतरले. पुढे आले आणि आम्हाला म्हणाले, “बसू का, इथे तुमच्याबरोबर?” आम्हाला असं कुणीतरी येतंय ह्याचा आनंदच झाला होता. कुणीतरी पत्रकार असावेत असं वाटलं. नंतर मग कुणीतरी विचारलं “बसा की पण नाव काय तुमचं?” ते म्हणाले “शरद जोशी”.

शेतकरी आंदोलनाला पाठींब्याचं आंदोलन असो किंवा “कट्टा” नावाचं अनियतकालिक असो किंवा श्रमिक विचार ह्या वृत्तपत्रात कुणी काय लिहायचं ह्याची चर्चा असो, सगळं चालायचं डिलाईटवरून. काॅलेजमध्ये शिक्षण वगैरे इकडे आमचं लक्षच नव्हतं. एकदा एस.पी. मधे काही मुलांच्या घोळक्यात बसलो असताना सायन्सचे उप-प्राचार्य सरळ चालत माझ्याकडे आले. तोपर्यंत फक्त प्रॅक्टिकल्स सोडली तर मी कुठेच असायचो नाही. प्रॅक्टिकल्ससुध्दा तिथे उपस्थित नाही राहिलं तर परिक्षेला बसता येत नाही म्हणून करायचो. आमचं सगळं लक्ष क्रांती कशी होईल इकडेच असायचं. सर सरळ आले आणि म्हणाले, “शिदोरे, ह्या वर्षी तू काही पास होत नाहीस”. ही सूचना म्हणजे इशारा मानला आणि नंतर लक्षात ठेवून अभ्यासाकडे लक्ष दिलं. पास झालो.

आम्ही डिलाईट ला इतके असायचो की आमच्या नावानं तिथं पत्रंही यायची. अनिल शिदोरे ℅ कॅफे डिलाईट, डेक्कन जिमखाना, पुणे ह्यावर. तिथे मग तुकाराम किंवा चंद्रू पत्र आणून द्यायचे. एक दिवस माझा चुलतभाऊ अहमदाबादहून आला. त्याला घर माहीत नव्हतं, कारण आम्ही नवीन घरी रहायला गेलो होतो. तो डिलाईट ला आला तेंव्हा मी फर्ग्युसन मध्ये कुमारजींचं गाणं ऐकायला गेलो होतो. गाणं संपलं. मग त्या गाण्यातल्या बारकाव्यांवर आमच्यातली प्रदीप, विज्यासारखी जी मंडळी होती त्यांचं ऐकत ऐकत रात्री खूप उशीरा सायकल घ्यायला डिलाईट ला पोचलो. आमच्या दिवसाची सुरूवात डिलाइटनी आणि शेवटही डिलाइटवरूनच व्हायचा. तसंच तिथे सायकल घ्यायला पोचलो तर सुधीर बराच वेळ झाला आहे आणि येऊन बसला आहे हे समजलं. तो पोचला पण माझा भाऊ आहे हे समजल्यावर कुणीतरी माझी सायकल आहे का हे पाहिलं आणि त्याला म्हटलं, “थांब तू. तो येईलच.” त्याला अर्थातच मी येईपर्यंत कुणीच एकटं वाटून दिलं नाही.

कुमार गंधर्वांचं गाणं कुठेही असलं, किशोरी अमोणकर किंवा कुणी काही प्रयोगशील करत असेल तर आम्ही तिथे हजर व्हायचोच. एकदा प्रदीप म्हणाला, “उद्या येतोस का? सकाळी लवकर सहा-साडेसहाला?” मी का म्हणून विचारलं तर म्हणाला, “उद्या कुमारांची मैफल आहे सकाळच्या रागांची बरोब्बर ९ वाजता”, मी म्हणालो “मग, सहाला कशाला?”, तर तो म्हणाला “कुमारजी सात-साडेसातला तंबोरे लावायला बसतील. ते ऐकू चल.” आम्ही सकाळी सकाळी गुडलकला चहा घेऊन तिथे पोचलो. नंतरचं गाणं तर अप्रतिम झालंच, पण त्याआधी कुमारजींचं ते तंबोरे लावणं, त्यातली तन्मयता, अचूकतेचा आग्रह, ती सुरावट मी कधीही म्हणजे कधीही विसरू शकणार नाही.

ह्या अशा कित्येक प्रसंगानं आयुष्य इतकं समृध्द केलं आहे की ते किती भरून घ्यायचं कळत नाही. स्मृतींची ओंजळ कमी पडते.

अशाच एका गाण्याच्या कार्यक्रमावरून कुणाबरोबर तरी रात्री डिलाईटला आलो आणि मला आत गडबड दिसली. खरं तर भूक खूप लागली होती. काही खावं तर खिशात पैसे नव्हते. घरी लवकर जायला हवं होतं नाही तर रोजच्या सारखी बोलणी खायला लागणार होती. म्हणून लांबूनच हात करून निघणार तेव्हढ्यात अजितनी बोलावून घेतलं. म्हणाला “मन्सूरला गोळ्या घातल्या”… “मन्सूरला गोळ्या? कुठे? का?”

मला काही सुधरेच ना.

चारच दिवसांपूर्वी आमच्या सगळ्यांचा निरोप घेऊन मन्सूर इराणला गेला होता. गोल चष्मा, बारीक कापलेले कुरळे केस, काॅलेजमध्ये स्काॅलर मुलं दिसतात तसा गंभीर चेहरा पण त्यावर एक प्रकारची प्रगल्भता. मन्सूर इथल्या इराणी विद्यार्थांचा नेता होता. डाव्या विचारांचा होता. इराणमध्ये डावे आणि धर्मवादी असा संघर्ष चालू होता. त्या संघर्षाचे पडसाद इथे पुण्यातही पडत होते. इराण अशांत, अस्वस्थ असल्यानं शिकायला येणारी ही मुलं आपापले राजकीय वाद आणि तिथला संघर्ष घेऊन इथे पुण्यात एकमेकांशी भांडत होती.

आम्हाला कळलं की आमचा निरोप घेऊन मन्सूर तेहरान विमानतळावर पोचला न पोचला तोच तिथे त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्याशी वैचारिक चर्चा, गप्पा, वाद-विवाद घालण्यात आमच्यातली सिनियर मंडळी पुढे असत. एकदा मात्र त्याला वाडिया काॅलेजमध्ये निरोप द्यायला मी एकटाच गेलो होतो, नंतर मग त्याच्याबरोबर त्याच्या खोलीवर. आपल्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय किनार असते, स्थानिक प्रश्न हा कितीही स्थानिक असला तरी शेवटी कुठेतरी तो आंतरराष्ट्रीय परिस्थितीशी जोडलेला असतोच हे तेंव्हा पटलं होतं.

मन्सूरला मारल्याचे पडसाद पुण्यातही उमटले. त्यानंतर पुण्यातही एकमेकांवर गोळ्या झाडण्याचे प्रकार त्या इराणी विद्यार्थ्यांमध्ये सुरू झाले. मग “जगातले सगळे क्रांतीकारक एक” ह्या तालावर आम्ही त्यांना धीर द्यायला, कधी त्यांना संरक्षण द्यायला त्यांच्या रहाण्याच्या ठिकाणी जायचो. तिथे गेलो तरी तिथेही आमचं “स्टडी सर्कल” चालूच असायचं.

“स्टडी सर्कल” ही गोष्ट आमच्या सगळ्याच कामातली फार महत्वाची. काहीही करायचं तर चर्चा ही व्हायचीच व्हायची. इराणमध्ये चाललेल्या संघर्षाबाबतही मांडणी करायला मन्सूरचा एक मित्र आला होता. दिल्लीहून विद्यार्थी नेते यायचे. त्यावेळच्या मुख्यमंत्री वसंतदादांनी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करू असं सांगितलं होतं, त्याच्या मागणीसाठी जे आंदोलन झालं होतं त्यातली नेतेमंडळीही डिलाईटला यायची. आमच्याशी खूप चर्चा करायची. त्यांच्या कविता वाचून दाखवायची. आम्हीही विद्यापीठ नामांतर आंदोलनाला पाठींबा दिला होता. त्यावर आमचं एक पाच-सहा दिवसांचं सलग मोठं “स्टडी सर्कल” झालं होतं. त्यानंतर हमाल भवनात एक राज्यव्यापी अधिवेशन झालं होतं तेंव्हा बाबा आढावांनी सांगितलं म्हणून आम्ही पथनाट्यही केलं होतं. पण पथनाट्य असो, कुठलं आंदोलन असो किंवा संघटनेतर्फे कुठली भूमिका मांडायची असो त्यावर प्रदीर्घ चर्चा, अभ्यास, मग पुन्हा चर्चा ही गोष्ट असायचीच. आमची स्टडी सर्कल्स तर असायचीच पण पूर्वीचा “मागोवा” नावाचा एक गट होता, त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार करावा, नवनव्या लेखकांना लिहितं करावं, डाव्या आणि मार्क्सवादी चळवळीला ताकद मिळावी म्हणून “तात्पर्य” ह्या नावानं एक मासिक काढायचं ठरवलं होतं. त्याच्या मदतीला आम्ही लागलो आणि मग “तात्पर्य”च्या गच्चीवर, गं. बा. सरदार, दि.के. बेडेकर ह्यांचा ग्रंथसंग्रह असलेल्या जागेत आमची स्टडी सर्कल्स व्हायची. कधी राजीवच्या घरी व्हायची. राजीवच्या घरी आम्ही सलग आठ-दहा दिवस कार्ल मार्क्सच्या “दास कॅपिटल”वर चर्चा केलेली मला आठवते आहे. “तात्पर्य” चे अंक पोस्टात टाकण्यासाठी, त्याला पोस्टाचे स्टॅम्प लावण्यासाठी आम्ही एकत्र जमायचो. तेंव्हाही एखादा विषय सोबत असायचाच.

सततच्या चर्चा, वादविवाद, नवनवे विषय काढून तू काय वाचलंस, मी काय वाचलं, मला काय वाटलं हे करणारी डिलाईटच्या परिसरात दीड-दोनशे मुलं-मुली होती. कुणाची आवड कविता होती, कुणी आर्थर सी क्लार्कच्या सायन्स फिक्शननी झपाटलेलं होतं. आमच्या ह्या विषयावरच्या चर्चा फक्त पुण्याच्या ग्रुपपुरत्या मर्यादीत नव्हत्या. आमच्यातली काही मंडळी शहाद्याला श्रमिक संघटनेत किंवा मनोरला भूमीसेनेत काम करायला मधून मधून जात होती. तिथेही संपर्क होता. कधीही कळायचं, मनोरला शिबीर आहे की चाललो तिकडे. महाराष्ट्रातल्या मुंबई, ठाणे, औरंगाबादच्या विद्यार्थी संघटना, आयआयटीमधले ग्रुप्स, फिल्म इन्स्टिट्यूट, जेएनयू अशा सर्वांशीच आमचा संबंध होता.

त्यातलाच एक किस्सा पुढे.

एक दिवस महाराष्ट्रातल्या विविध विद्यार्थी संघटनांची बैठक आम्ही पुण्यात ठरवली होती. स्थळ होतं शनिवार पेठेतलं छोटंसं कुठलं तरी मंगल कार्यालय. कार्यालय छोटंच होतं. दुपारी तीनची वेळ होती. माझ्याकडे व्यवस्थेची जबाबदारी होती. म्हणून मी थोडा आधीच पोचलो होतो. साधारण अडीच-पावणेतीनचा सुमार असेल. दोन-तीन आज्ज्या काहीतरी निवडत, वाती वळत बसल्या होत्या. मी पोचलो आणि माझ्या मागोमाग ठाण्याहून तिथली एक कार्यकर्ती पण पोचली. आम्ही ओळखी करून घेतल्या. जरा इकडचं तिकडचं बोलत राहिलो. तेव्हढ्यात तिनं थेट तिथल्या आज्ज्यांना विचारलं “आज्जी, माचीस आहे का हो?”. मी उडलोच. कुठे बघावं कळेना मला. “माचीस, माचीस. काडेपेटी?” तिनं पुन्हा विचारलं. त्यातली त्यातल्या त्यात चटपटीत आजी उठली आणि माचीस घेऊन आली. आमच्या ठाण्यातल्या मैत्रीणीनं नंतर सिगरेट काढली, टक टक करत त्या काडेपेटीवर एक-दोनदा आपटली आणि मस्त पैकी पेटवून झुरके घेतले, मजेत.

वर्ष बघा १९७८, स्थळ बघा पुण्याच्या कट्टर शनिवार पेठेतलं एक कार्यालय. पात्रं विद्यार्थी संघटनेचा एक मुलगा, एक मुलगी, तीन आज्ज्या आणि सिगरेट. कमाल आहे की नाही? अशा कितीतरी गोष्टी आहेत. माझ्यासमोर माझ्या एका मैत्रीणीनं आमच्या काॅमन मित्राला सरळ सांगितलं होतं, माझ्या समोर स्ट्रेट, “लग्न बिग्न नको रे. एकत्र राहू या का तसेच?” आमच्यातले काही जण तसे राहिलेही होते. तशाही गोष्टी त्यांनी केल्या होत्या.

वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं आमचं चालूच होतं. आपण कोण आहोत? आपला समाज कसा आहे? आपल्या धर्म परंपरेत काय काय आहे? जाती का आहेत? इतिहास म्हणजे फक्त राजे-राजवाड्यांचा इतिहास की सामान्य लोकांचा? अशा गोष्टींवर आमची सतत खडाजंगी चालू असायची. कुणीतरी काहीतरी घेऊन डिलाईटला यायचं, आपलं मत मांडायचं, मग त्यावर ही बाजू, ती बाजू असं सतत चालायचं. ई.एच. कार चं “व्हाॅट ईज हिस्टरी”, देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचं “लोकायत”, राजवाड्यांचं “भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास”, कोसंबी, काॅम्रेड शरद पाटील ह्यांनी आम्हाला झपाटून टाकलं होतं. माझं घर धार्मिक अजिबात नव्हतं तरीही ह्या विश्लेषण पध्दतीनं जगाकडे बघण्याचा दृष्टीकोनच पार बदलून गेला.

तशातच गणेश उत्सव आला.

आपल्या समाजात लोक देव कसे मानायला लागले, ह्या देव-देवतांच्या मागे काय समाजशास्त्र आहे, ह्या देवकल्पनांमागची कल्पना काय अशा गोष्टींचा आमचा अभ्यास सुरू होताच. रोज वेगवेगळं वाचायचो, काहीतरी कानावर पडायचं. ज्ञानयज्ञ चालू होता. त्यात आम्हाला वाटलं की “गणेश” ह्या देवकल्पनेविषयी माहिती एकत्र करून आपण त्याचं प्रदर्शन मांडावं. “गणपती”, “गणेश” ह्या देवतेचं मूळ काय आहे, लोक गणेशाला का मानायला लागले, त्यावेळची लोकांची गरज काय होती? मग गणांचा पती, गणपती म्हणजे काय, पूर्वीचा समाज टोळ्यात किंवा गणात कसा रहात होता ह्याविषयीची मांडणी त्यात करायची असं ठरलं.

झालं. मुहूर्त ठरला गणेश उत्सवाचा. “गणपती प्रदर्शन”. गणपती ह्या देवाविषयीची माहिती. जुन्या ग्रंथात, वेदात काय काय मांडलेलं आहे ह्याची चित्रं, चार्ट्स, माहिती अशांचं प्रदर्शन एस.पी. काॅलेजमध्ये लावायचं ठरलं. उदघाटन गणेश चतुर्थीलाच करायचं ठरलं. जोरदार तयारी सुरू झाली. हे अर्थातच पुण्यातल्या सनातन मंडळींना पसंत नव्हतं. एखाद्या देवाची “देव” ही कल्पना कशी निर्माण झाली, त्यामागे कुठल्या सामाजिक-आर्थिक बाबी आहेत, बाजू आहेत ह्याबाबतची साद्यंत माहिती आम्ही एकत्र केली होती. मोठमोठ्या चार्ट्स वर मांडली होती. परंतु एखाद्या देवाबाबत असं मांडणं हेच त्यांना रूचलेलं नव्हतं. तसंच पुण्यातील विविध काॅलेजेस मध्ये डाव्या विचारांचा, मार्क्सवादी, कम्युनिस्ट विचारांचा तरूण-तरूणींवरचा वाढता प्रभाव हा देखील प्रकार संघाच्या काही मंडळींना रूचणारा नव्हता. त्यांनी फूस लावली. प्रदर्शन आम्ही मांडत असतानाच पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येऊन ते प्रदर्शन उधळून लावलं. आमच्यापैकी तिथे जे होते त्यांना मारहाण केली. दहशत निर्माण केली.

मग दोन्ही बाजूंनी एकमेकांवर केसेस घालण्यात आल्या. माझाही रात्रभर पोलीस कोठडीत रहाण्याचा तो पहिला प्रसंग होता. पतितपावननी आमच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचं कलम टाकलं होतं. पोलीसांनी मग तज्ञ म्हणून रा.चिं. ढेरेंना विचारलं. ह्या मुलांनी कुठले संदर्भ दिले आहेत, ह्यांनी काही स्वत:च्या मनानी मुद्दाम भावना दुखवण्यासाठी काही केलं आहे का असंही विचारलं. मात्र ढेरेसरांनी प्रदर्शनाचा मजकूर पाहून स्वच्छ सांगितलं, की ह्या मुलांनी जे संदर्भ दिले आहेत ते बरोबर आहेत, ते धर्माच्या मूळ ग्रंथातूनच घेतलेले आहेत. ह्यांच्या मनाचं काहीच नाही.

अर्थशास्त्र, चित्रपट, साहित्य, नाट्य, इतिहास, धर्म, विज्ञानकथा, राजकारण, समाजकारण, मानव विज्ञान अशा कितीतरी दालनातून आमची भ्रमंती होत होती. ह्या सर्वाचं केंद्र होतं डेक्कनवरचं कॅफे डिलाईट किंवा डिलाईट विद्यापीठ.

अगदी त्याच सुमारास पुण्यात “लोकविज्ञान संघटनेचं” कामही मूळ धरू लागलं होतं. लोकांमध्ये विज्ञान दृष्टी वाढावी, जोपासली जावी म्हणून शिबीरं घेणं, काही विज्ञान प्रयोग करून दाखवणं, चमत्कार वगैरे काही नसतं, असतात ते फक्त जादूचे प्रयोग हे सांगण्यासाठी विविध उपक्रम करणं हे त्यांचं चालू होतं. आमच्यापैकी काहीजण तिथेही सहभागी व्हायचे. ज्याची जी आवड तिथे तो आपोआप जायचा. कुणी न्यावं लागायचं नाही. त्याच वेळी एक सूर्यग्रहण होणार होतं. “लोकविज्ञान संघटनेनं” ठरवलं की लोकांना ग्रहण बघण्यासाठी चष्मे द्यायचे, ग्रहणामागचं विज्ञान समजावून सांगायचं. काही दिवस हा ही उपक्रम चालला. सर्व बाजूनी मनाची मशागत होत राहिली. मात्र हे सूर्यग्रहण झालं त्याच सुमारास कुठून कसं पण महाराष्ट्राच्या समाजमनालाही ग्रहण लागायला सुरूवात झाली. जे ग्रहण अजूनही सुटलेलं दिसत नाही.

महाराष्ट्राच्या ग्रहणाची सुरूवात ऐंशीच्या दशकाच्या मध्यात किंवा थोडी नंतर सुरू झाली.

बरीच जमवाजमव होऊन महाराष्ट्रात पुलोदचा एक राजकीय प्रयोग झाला. त्याला नितीचा ठहराव नव्हता. त्यातून तत्वांसाठी राजकारण संपून संधी साधणं म्हणजेच राजकारण हे दृढ होऊ लागलं. ऐंशीच्या दशकात धर्माच्या विषयात भूमिका घेऊन महाराष्ट्रानं “हिंदुत्व” राजकारणाच्या मुख्य धारेत आणून ठेवलं. सर्वच क्षेत्रात सुमारांची सद्दी सुरू झाली. कोण कसा आहे पेक्षा कोण कुणाचा आहे ह्याला महत्व आलं. वृत्तपत्रांवर निर्भीड बाण्याच्या संपादकांपेक्षा प्रत्येक गोष्ट विकायला बसलेल्या लोकांची मालकी आली. त्यामुळे वृत्तपत्रं आणि माध्यमं एक विकण्याची वस्तू झाली. शिक्षण क्षेत्रं ध्येयवादापेक्षा अर्थवादाकडे झुकलं. सगळंच बाजारात विकायला आलं. रसरशीत साहित्य परंपरा ढासळायला लागली. साहित्यिक, विचारवंतांचा धाक संपला. तशातच देशानं मुक्त अर्थव्यवस्था अंगिकारली. त्याचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रावर झाला. संस्कृतीनं समाजाचं भरणपोषण सोडलं. संस्कृती करमणुकीपुरती, धिंगाण्यापुरती, फॅशन शो पुरती राहिली. भ्रष्टाचार राजकारणातून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरला आणि हळूहळू महाराष्ट्राचा प्रबोधनकाळ महाराष्ट्रालाच विसरायला झाला. आता अवस्था अशी आली आहे की महाराष्ट्राच्या ह्या प्रबोधन युगाचं एखादं स्मारक फक्त करण्याची गरज आहे. फक्त त्यासाठी कुठला भूखंड मिळवायचा आणि कुणाची आर्थिक मदत घ्यायची इतकाच प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा तो गौरवशाली काळ आपण साफ विसरलो.

आम्हीही विसरलो होतो. राजीवच्या पुस्तकानी त्याची आठवण झाली. एक खरं की त्या काळानी आमच्यावर मोठीच जादू केली. आम्हाला आमचं आमचं आकाश दिसलं. अवकाश मिळाला. सूर सापडला. नंतर मी ही माझ्या स्वभावानुसार आदिवासींमध्ये काम करत असलेल्या शरद कुलकर्णींच्या आदिवासी जाणीव जागृती केंद्रात जाऊन पोचलो. तिथून मग माझ्या आयुष्यातील आणखी एक नवीन प्रकरण सुरू झालं.

इतकं झालं तरी डिलाईट माझ्या पुरतं संपलं नाही कारण डिलाईट ही एक वृत्ती आहे, जी त्या चार वर्षात अंगात पार भिनली आहे. मुक्त आणि उन्नत समाजाची सूत्रं त्यात आहेत.

आजही डेक्कन वरून फर्गसनकडे जाताना तरूण-तरूणींचे घोळके तिथे पहातो. आज त्या परिसराला फॅशन स्ट्रीटचं स्वरूप आलं आहे. संध्याकाळी तर तिथे अफाट बाजार भरलेला असतो. खाण्याचे स्टॉल्स, कपड्यांचे विक्रेते, झगझगीत कपडे ह्यांनी तो रस्ता सतत गजबजलेला, फुललेला, सजलेला असतो. मी मग त्या रंगीबेरंगी, उठवळ, कर्कश्य, बटबटीत बाजारातून डिलाईट दिसतंय का ते पहात रहातो.

मला डिलाईट तिथे तर नाहीच, पण कुठेच दिसत नाही… कुठेच.

अनिल शिदोरे anilshidore@gmail.com
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.