मराठीला गुलाम करण्याचा हिंदी कावा

प्राण्याचा माणूस होण्यात भाषेनं मोठी कामगिरी बजावली. माणूस ज्ञान मिळवतो भाषेमधून. ते पसरवतो ते ही भाषेमधून. भाषाच नसेल तर फक्त हातवारे करून माणूस काय काय करेल?

“भाषा” ही गोष्ट माणसाच्या माणूसपणाच्या मुळाशी आहे. माणूसपणाच्या मुळाशी आहे आणि संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे.

भाषा म्हणजे काय?

भाषा म्हणजे चिन्हं. खुणा. संज्ञा. एखाद्या गोष्टीचं वर्णन रण्यासाठी केलेला उच्चार. म्हणजे “आकाश निळं आहे”. हे वाक्य म्हणताना मी तुम्हाला सांगतो आहे की हे जे डोक्यावर अफाट असं दिसतं आहे त्याला आकाश म्हणतात. तुम्हीही त्याला आकाश म्हणता, मी ही म्हणतो. आपण सर्वांनी मानलं आहे की हे जे काही अफाट दिसतंय ते आकाश आहे. त्याचं मला वर्णन करायचं आहे त्यामुळे एका विशिष्ट प्रकारच्या रंगाला मी निळा रंग म्हणतो, तुम्हीही त्याला निळा रंगच म्हणता आणि मराठी भाषा बोलणारे सर्वजण त्याला निळा रंगच म्हणतात.

आपण सर्वांनी भाषेची ही शिस्त मानली आहे. त्यामुळे भाषा म्हणजे शिस्त.

कशाला काय म्हणायचं, त्या गोष्टीला तेच म्हणायचं हे आपण सर्वांनी मानलं आहे. म्हणून एकाच रंगाला तुम्ही पिवळा म्हणता आणि मी मात्र निळा म्हणतो असं होत नाही. मराठी बोलतात अशा सर्वांनी ही संज्ञा मानली आहे. त्यांच्या घरात, दारात, एकमेकांशी बोलताना ते ह्याच संज्ञा वापरतात.

हे झालं प्रत्यक्ष दिसतंय अशा गोष्टीबाबत. पण “ आकाशाचा निळा रंग किती आल्हाददायक आहे” म्हणताना मी “आल्हाद” ह्या अमूर्त गोष्टीबाबतही बोलतो. जे म्हणजे काय हे ही आपण सर्वांनी मिळून ठरवलं आहे. मान्य केलं आहे.

भाषेचं काम आकलन होणं, विचार करणं, तो विचार मनात मांडून ठेवणं, त्याबाबतचे निर्णय घेणं आणि त्यानंतर तो निर्णय, विचार पसरवणं. समाजात विचारांची देवाणघेवाण करणं.

माणूस जेंव्हा तान्हं बाळ असतो तेंव्हा आईच्या, कुटुंबाच्या, आसपासच्या भाषेत जगाचं आकलन करत असतो. जे शब्द त्याच्या कानावर पडतात त्यातून तो त्याचे ठोकताळे बांधतो, काय हवं काय नको ते ठरवतो. निर्णय घेतो. त्याबाबत विचारांची देवाणघेवाण करतो. संशोधनानी हे समजलं आहे की जेंव्हा मूल त्याच्या आईच्या, परिसराच्या, कुटुंबाच्या भाषेत विचार करतं, विचारांची देवाणघेवाण करतं, आसपासच्या परिसराचं आकलन करतं तेंव्हा ते ती गोष्ट अधिक चांगली करतं. परिसरभाषेत त्या लहान मुलाची निर्णयक्षमता, आकलन, निरीक्षण, विचार, मांडणी, सृजनशीलता अधिक सघन होते. ह्याबाबत कुणाचंच दुमत नाही.

मग तरीही अगदी तीन वर्षाच्या बाळाला दुसरी भाषा हिंदी आणि तिसरी भाषा इंग्रजी शिकवण्याचा अट्टाहास आपण का करत आहोत? त्यानं काय मिळणार आणि आपण काय गमावणार?

माणसाची निर्णयक्षमता (judgement) ही त्याच्या आईच्या भाषेतच विकसित होत असेल तर दुसरी भाषा शिकवून आपण आपल्या मुलांना खुरटवतोय का? त्यांची विचारांची क्षमता छाटतोय का? स्वभान, स्वाभिमान, अस्मिता, धाडस, सृजनशीलता, वक्तव्य (expression), तर्कशुध्दता, परखडता, न्यायबुध्दी, स्वतंत्र प्रज्ञा, संशोधनवृत्ती, प्रतिभा ह्या गोष्टी परभाषेत विकसित होतील का? झाल्या तरी ते होता होता त्या व्यक्तीची प्रचंड उर्जा त्यात खर्च होणार नाही का? ती होणं हे एका अर्थानं समाजाचं नुकसान नाही का?

की काही लोकांना मराठी माणसात स्वभान, स्वाभिमान, तर्क, सृजनशीलता, धाडस, स्वत:च्या इतिहासावर प्रेम तयारच होऊ नये असं वाटतंय आणि मराठी माणसं खुजी करण्याचं हे एक मोठं राजकीय षडयंत्र तर नाही ना?

कारण, अशी शक्यता आहे की काहींना स्वतंत्र विचार करणारी, निर्णय घेणारी माणसं तयारच होऊ नयेत असं वाटत असेल. जसं मेकाॅलेला भारतात इंग्रज सत्ता चालवण्यासाठी कारकुनांची फौज तयार करायची होती तसं आपल्या विचारातला देश तयार व्हावा आणि फुटकळ भांडवलशाही पोसली जावी म्हणून स्वत:च्या मूळ संस्कृतीचा साफ विसर पडलेले भरपूर पगाराचे कामगार आणि त्यांचा माल विकत घेणारे ग्राहक त्यांना तयार करायचे आहेत? आणि, ह्यापलीकडे माणूस म्हणून त्यांचा विकास होण्याची काळजी कुणाला नाही?

वयाच्या तीन, चार वर्षांपासून हिंदी शिकवण्याचा घाट घालणे, मराठी बरोबर इंग्रजीचे सामाजिक संस्कार करत रहाणे ह्यातून मराठीसारख्या एका महान संस्कृतीला सुरूंग लावण्याचं हे एक कारस्थान चालू आहे. आता ते पुढच्या काही वर्षात वाढणार. इंग्रजी माध्यमात शिकलेला मुलगा “शिवाजी महाराज की जय” हे मुठी आवळून म्हणूच नये असा हा प्रोजेक्ट आहे. आग्रा दरबारात अपमान झाल्यावर कसं वागायचं असतं ह्याचे संस्कार होणारच नाहीत, दिल्लीश्वर आहेत ना मग तिथे बंड करायचं नाही, त्यांच्या पदरी आपली जागा पंच-हजारी सरदारांचीच आहे असं मनोमन मान्य करणारा समाज तयार व्हावा असे संस्कार ह्या शिक्षणपध्दतीत केले जाणार आहेत.

गुलामीचे, लांगुलचालनाचे, अवलंबून रहाण्याचे, खाली मान घालून हुकुम ऐकण्याचे संस्कार ह्या शिक्षणप्रणालीतून होणार आहेत. आज जरी दक्षिणेकडील राज्यांच्या धाकानं हिंदीतून सक्तीचं शिक्षण मागे गेलं असलं तरी ते पुन्हा डोकं वर काढणारच नाही असं नाही. मराठी संस्कृतीला हिंदीच्या दावणीला बांधून त्याचं खच्चीकरण करण्याचा हा उद्योग आहे.

शिक्षणप्रणाली समाजाचा स्वभाव घडवते. आत्ता जी शिक्षणप्रणाली आहे तिचं उद्दिष्ट लोकांनी मराठी विसरावी असा आहे. स्वाभिमानी, सृजनशील, रसिक, चौफेर दृष्टी असलेला, पाय मराठी मातीत ठेवून जगाचं आभाळ हातात घेण्याची इर्षा ठेवणारा मराठि माणूस ह्यातून निर्माण होणार नाही ह्याची चोख व्यवस्था आहे.. अशा ह्या मराठी संस्कृतीच्या मुळावर आलेल्या शिक्षणप्रणालीचा धि:कारच केला पाहिजे.

अनिल शिदोरे

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.