महाराष्ट्राला सांस्कृतिक आधार हवा

महाराष्ट्र राज्य साठीला आलं. एकेकाळी देशावर राज्य करणारा महाराष्ट्र आज इतरांच्या रांगेत उभा आहे. हजारो वर्षांची उज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्राचं “नैतिक होकायंत्र” हरवलं आहे. ते सापडवल्याशिवाय महाराष्ट्राला गती नाही.

अनिल शिदोरे

anilshidore@gmail.com

— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —

महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठ वर्ष झाली. महाराष्ट्राला मात्र हजारो झाली.

तसं पाहिलं तर साठ वर्षांचा काळ कुठल्याही समाजासाठी फार मोठा नाही. पण फार छोटाही नाही. आढावा घेण्याइतपत पुरेसा आहे.

“आपलं रा्य आपणच चालवलं पाहिजे” अशा स्वाभिमानी बाण्यातून “स्वराज्य” स्थापन झालं. ती मराठा साम्राज्याची मूळ प्रेरणा. ती ज्योत छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवली. नंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि मराठा साम्राज्यानं जवळजवळ सगळ्या देशावर राज्य केलं आणि आपला प्रभाव पाडला. थोडा-थोडका नाही तर मराठा साम्राज्याचा भारतीय राजकारणावरचा प्रभाव सुमारे १४४ वर्ष टिकला. म्हणजे अगदी नेमकं बोलायचं तर १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेंव्हापासून ते इंग्रजांनी १८१८ ला पुण्याच्या शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकावण्यापर्यंत. बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, झांशी, धार ह्यासारख्या संस्थानांनी हा प्रभाव आणखी वाढवला. हा प्रभाव फक्त राजकीय नव्हता तर संस्कृती, समाजकारण ह्यावरही होता.

मराठा साम्राज्यावर निर्विवाद विजय मिळवेपर्यंत इंग्रज शांत नव्हता. अगदी १८१८ ला पेशवाईचा अस्त झाल्यावरही पुढे १८५७ पर्यंत स्वराज्यातील हे अंगार कुठे ना कुठे इंग्रजाला छळत राहिले. नडत राहिले. म्हणूनच नंतर इंग्रजांनी विशेष हुकूम काढून मराठी माणसाला जिथून प्रेरणा मिळते असे गढ-किल्ले फार पध्दतशीरपणे उध्दवस्त केले. त्यांना मराठी माणसाला त्यांच्या राजानी दिलेला विचार मारायचा होता.

पण तरीही तो विचार संपला नाही.

नंतरचं सामाजिक प्रबोधनाचं पर्व असो, इंग्रजी सत्तेला दिलं जाणारं आव्हान असो, साहित्य संस्कृती असो की शिक्षणाचा प्रसार असो. स्वराज्याचा अंगार महाराष्ट्रात वेगवेगळे दिवे पेटवत राहिला. स्वातंत्र्याच्या थोडं आधी महाराष्ट्रात जे उद्योगधंदे भरभराटीला आले त्यालाही तीच १६७४ साली पेटवलेली ज्योत कारणीभूत आहे. नंतरही महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याच्या पुढे-मागे झालेला शिक्षणाचा प्रसार, सहकार चळवळ आणि राज्यातली उद्योगांची भरभराट ह्या सगळ्या गोष्टीमागे पुण्याई आहे ती स्वराज्याची. स्वराज्यानं निर्माण केलेल्या एका सुबुध्द, सुसंस्कृत समाजाची.

अगदी जवळचा इतिहास पाहिला तर हे सगळं १९७५ पर्यंत चालू राहिलं. तितक्या तेजस्वी पध्दतीनं नव्हे पण राहिलं.

त्यानंतर आणीबाणी आली आणि ह्या प्रभावाला तडे जायला सुरूवात झाली. दिल्लीसमोर झुकायचं, “हायकमांड” ला खूष करायचं ही सवय महाराष्ट्राला लागली. नंतर मुंबईत १९८२ चा गिरणी कामगारांचा संप झाला. राज्यकर्ते, नोकरशहा आणि थैलीशहांची मजबूत आघाडी झाली, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली रयतेच्या कल्याणाची शिकवण विसरली गेली आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला ग्रहण लागायला सुरूवात झाली. १९७५ ते १९८५ ह्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या पतनाची खात्रीशीर सुरूवात झाली. मग युत्या-आघाड्यांचे सोयीस्कर व्यवहार आले. महाराष्ट्रानं आर्थिक उदारीकरणाचं वारं प्यायलं आणि नितीची जागा पैशानं घेतली.

बाजार महत्वाचा ठरला. बाजाराधिष्ठीत अर्थकारण तर सुरू झालं पण ते पोचलं सगळ्या समाजाचाच बाजार उठवण्यापर्यंत. सगळीकडे बाजार. शिक्षणात बाजार, राजकारणात बाजार, वृत्तपत्रात बाजार, घरात बाजार, धर्माचा बाजार, संस्कृतीचा बाजार. बाजार. फक्त बाजार.

साधारण १६७४ ते १९७५ अशा तीनशे वर्षात मराठी समाज उत्तुंग शिखर गाठून नंतर अस्ताला लागला. नंतर मग १९७५ ते २०२० अशा पुढच्या ४५ वर्षात हा कल मग पुन्हा उलटा फिरलाच नाही. एकेकाळचा, देशाचं नेतृत्व करणारा आधुनिक विचारांचा सशक्त मराठी समाज आता देशाच्या इतर राज्यांप्रमाणे एक रांगेत सर्वांसारखा निमूटपणे उभा आहे. केंद्र कधी निधी देतोय याची वाट पहात.

महाराष्ट्र साठ वर्षांचा होताना महाराष्ट्राची ही अवस्था बघवत नाही.

एखादा समाज हळू हळू खाली जात रहातो त्याची अनेक कारणं असतात. फक्त एखाद्या गोष्टीत कारण शोधू नये. कधी नैसर्गिक आपत्ती येते किंवा मोठं युध्द होतं. कधी त्या समाजाच्या बाहेरची परिस्थिती अपार बिघडते, समाजाचा आर्थिक डोलारा कोसळतो आणि मग समाजाला स्थिरताच येत नाही. कधी समाजाच्या अंतर्गत संघर्ष किंवा कलह असे होतात की समाजाची तब्येत बिघडते.

कधी समाजाचा नैतिक तोल जातो आणि समाज खाली जाऊ लागतो. काय चांगलं, काय वाईट, किंवा काय घेतलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे ह्याचा “विवेकी” निर्णय समाजाला करता येत नाही. कशानं तरी सगळा समाज आंधळा झालेला असतो. कधी भौतिक सुखाची चटक असते तर कधी धर्मवेडेपण येतं किंवा एखाद्या नेत्याच्या पायाशी विवेक गुंडाळून ठेवण्यातच समाजाला धन्य वाटायला लागतं. समाजाचं पतन होतच रहातं. अगदी त्याकाळात भौतिक प्रगती होत राहिली तरी. कारण त्या भौतिक प्रगतीला संस्कृतीचा आधार नसतो.

महाराष्ट्राचं असंच काहीसं झालं आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक आधार सुटला आहे.

संस्कृती कायम नसते. प्रवाही असते. बदलणारी. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात मराठी समाजाची जी संस्कृती होती तशीच आज नाही. त्यातले काहीच अवशेष शिल्लक आहेत, रायगडावर किल्ल्याचे आहेत तसे. संस्कृती म्हणजे आपल्याला वाटतं धार्मिक रिती-रिवाज, गाणी, गोष्टी आणि खाद्यपदार्थ. पण फक्त तेव्हढं म्हणजे संस्कृती नाही. संस्कृती म्हणजे समाजावरचे संस्कार. नितीची, मूल्यांची, श्रध्दांची चौकट.

संस्कृती घडण्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे भूगोल. बघा ना, आदिवासी समाज जो जंगलात रहातो त्यांचे सगळे देव हे निसर्गाशी संबंधित आहेत. कारण त्यांच्या भूगोलात जंगल आहे. कोळी समाजाची बरीचशी गाणी समुद्राशी संबंधित आहेत. जिथे खडतर प्रदेश असतो तिथल्या माणसांचा स्वभाव त्याप्रमाणे बदलतो. त्यामुळे भूगोल महत्वाचा.

समाजाची संस्कृती घडण्यामध्ये दुसरं कारण असतं समाजातले आर्थिक संबंध. सगळ्या महाराष्ट्राची आजिविका सध्या एकसंध राहिलेली नाही. म्हणजे यवतमाळमधील आत्महत्या करणारा निराश शेतकरी पुण्याच्या हिंजवडीत साॅफ्टवेअरमध्ये काम करतो अशा इंजिनीअरशी जुळलेला नाही. तो तिकडे मेला तरी ह्याला इकडे काही फरक पडत नाही. किंवा, मुंबईतल्या उद्योगातील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी बीडमधल्या दलित वस्तीतील शिकलेल्या तरूणाशी कुठल्याच बाबतीत आर्थिक हितसंबंधांनी बांधलेला नाही. दोघांचं जग वेगळं आहे. कुणीच कुणावर अवलंबून नाही. त्यामुळे त्याचं काहीही होवो, माझं काहीच जात नाही अशी तुटलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मी त्याचा, तो माझा ही भावना मेली आहे.

तिसरं कारण असतं सामाजिक संबंधांचं. समाजाची उतरंड कशी आहे, समाजातील विविध लोकांच्या आकांक्षा कसकशा विकसित होत आहेत ह्यावरूनही समाजाची संस्कृती ठरते. नव्वदच्या दशकानंतर महाराष्ट्रातले आजवर विकासाच्या परिघाबाहेर असलेले कित्येक समाजगट बोलू लागले. ह्याला दोन महत्वाची कारणं. मंडल आयोगानं ह्या आशा-आकांक्षांना आवाज दिला, आणि आर्थिक उदारीकरणामुळे “मला पण त्यात वाटा पाहिजे” असं प्रत्येकाला वाटू लागलं. अर्थात ह्यात निसर्ग नियमांनुसार वर्षानुवर्ष शिक्षणानं पुढे असलेले समाजसमूह आणखी चटकन पुढे गेले आणि जगाच्या अंगणात गेल्यावर त्यांच्यातली देशभक्ती प्रखर झाली. मी मागे नको पडायला म्हणून सर्वांमध्येच प्रगती करण्याच्या इर्षेनं पैशांचं आकर्षण वाढलं. जो यशस्वी तो चांगला. यश म्हणजेच सर्वकाही अशी समाजाची धारणा झाली. ती अगदी राजकारणापर्यंत आली.

महाराष्ट्राचा भूगोल तर काही बदलला नाही. समाजव्यवस्था बदलत चालली आहे. आजवर विकासाच्या प्रक्रियेबाहेर असणारे विकासाच्या परिघात आले आहेत. स्त्रिया अधिक जागरूक झाल्या. समाजात जातीचं भान टोकदार झालं. गेल्या ५० वर्षात काहीही झालं, कुणीही सत्तेत आलं तरी कुणीच काही वाकडं करू शकत नाही असा एक “कायम प्रतिष्ठीत वर्ग” तयार झाला. त्यामुळे ज्यांचे राज्याच्या विकासात काहीच हितसंबंध (स्टेक्स) नाहीत पण स्वत:च्या विकासात आहेत असा वर्ग राज्य चालवू लागला.

रूढी, परंपरा आणि श्रध्दांच्या बाबतीत मोठे परिणाम झाले. जगाचा, देशातील इतर समाजांचा मोठा प्रभाव मराठी समाजावर पडला. भाषेवर परिणाम झाला. वृत्तीवर होऊ लागला. व्यापक असं दूरचित्रवाणी सारखं माध्यम रूढी आणि परंपरांचा एक छापाचा घाऊक माल सगळीकडे विकू लागलं. मराठी माणूस आपली ओळख विसरला. आपलं वेगळेपण घालवून बसला. त्याला मराठी शाळा बंद पडताहेत म्हणून काही वाटेनासं झालं. इतकं काय “मराठी, मराठी” करायचं, त्यापेक्षा गर्वानं बोलण्याजोग्या इतर गोष्टी त्याला दिसल्या. त्या त्यानं स्विकारल्या. इतरांसारख्याच श्रध्दा जपू लागला आणि समाजाचं नैतिक होकायंत्र पार विसकटलं. समाजाचं हे “नैतिक होकायंत्र” समाजाची संस्कृती ठरवणारी आणखी एक गोष्ट असते. पण ते बिघडलं. रोजच्या शेतकरी आत्महत्यांचं त्याला काही वाटेनासं झालं. सुरूवातीला तो जरा हळहळला, कारण कितीही म्हटलं तरी शिवाजी महाराजांचे संस्कार होते त्याच्यावर. पण नंतर त्याला त्या बातम्यांची सवय झाली.

उगाच भावनाशील होणं ही गोष्ट हास्यास्पद झाली. त्यानं काय “फायदा”? असा प्रश्न लोकांना पडू लागला. नैतिक संघर्षापेक्षा व्यावहारिक “सोय” पसंतीस उतरली. अनैतिक युत्या आघाड्यांचं तर ग्रामपंचायतीपासून राज्यापर्यंत पेव फुटलं. काहींच्या मते समाजाचं हे “नैतिक होकायंत्र” अधिक “व्यावहारिक” झालं. कारण “नैतिकता” हाच एक “व्यवहार” झाला. एक देवाणघेवाण. “आमची” इतकी मतं म्हणून आम्हाला हे हवं असा “व्यवहार” म्हणजे “निती” बनली. हे “नैतिक होकायंत्र” मधून मधून जाणकार मंडळींना दाखवावं लागतं. त्यांच्याकडून तपासून घ्यावं लागतं. तशी माणसं होती. पण आता तशी माणसंही नाहीत. त्यांच्याबरोबरचेही “व्यवहार” ठरल्यामुळे तेही होकायंत्राचे बदलते नियम मानत गेले. निती, तत्व, प्रामाणिकपणा, स्वाभिमान, शब्दाला जागणं, आधुनिक शास्त्रीय विचार या गोष्टी मागे पडल्या आणि महाराष्ट्राच्या दैदिप्यमान परंपरेच्या अस्ताची धुरकट चित्रं आपल्याला गेल्या ५ वर्षात अधिकच स्पष्ट दिसू लागली.

शेतकरी आत्महत्यांसारखा अत्यंत संवेदनशील विषय असो किंवा दुष्काळासारखं कठीण आव्हान असो, किंवा शेतमालाचा भाव असो की महिलांवरचे अत्याचार असो, किंवा अगदी आत्ताचा “करोना” चा मुकाबला असो. मराठी समाजानं आपला “बाणा” दाखवला नाही. आपलं “कॅरेक्टर” सिध्द केलं नाही. तिथेही सध्या इतर राज्यांची कामगिरी अधिक सरस दिसते आहे.

सुरुवातीलाच म्हटलं होतं की साठ वर्ष ही एखाद्या समाजाच्या दृष्टीनं काहीच नाहीत. पण समाज असाच काही वर्ष राहिला तर तो “कोमात” जाऊ शकतो, म्हणजे मग त्याचं काहीच होऊ शकत नाही. जे आहे ते चालू राहील. जीव राहील. पूर्वी जे प्रतिष्ठीत होते तेच पुन्हा प्रतिष्ठीत होतील. शब्द बदलतील. नव्या घोषणा येतील. पण समाज तिथेच राहील. असा निश्चल समाज ज्या समाजाला ना स्वप्नं पडतात, ना तो अस्वस्थ होतो, ना त्या समाजाला उत्तुंग भरारी घेण्याची जिद्द निर्माण होते. पुढेही नाही आणि मागेही नाही. असं काही शतकंही राहू शकेल.

एकेकाळचा पुढारलेला, आधुनिकता अंगी बाणवलेला, पाठीचा कणा ताठ असलेला हा समाज आता त्याला स्वत:चा “हेतू” सापडत नाही तोपर्यंत किंवा पुढचा “टप्पा” उमगत नाही तोपर्यंत “पैसा” किंवा “स्वार्थ” हीच “निती” मानून पुढे जात राहील असं दिसतंय. कारण वेगळी “स्वप्नं” पडायची तर “वेगळा” विचार करावा लागतो. त्यासाठी मुक्त विचार करण्याची समाजाची तयारी लागते. समाजाचं “नैतिक होकायंत्रं” सांभाळणारी शहाणी माणसं लागतात. नवे धोके स्विकारावेत असं वाटावं लागतं. कष्ट करावे लागतात. वेदनेचे चटके बसायला लागतात. तडफड व्हावी लागते. स्वार्थाला तिलांजली द्यावी लागते. समाजानं एकत्र काही ध्येय उराशी बाळगावं लागतं.

आज मराठी समाजाकडे पाहिलं तर असं काही करण्याची त्याची इच्छा आहे असं वाटत नाही.

उद्या काय होईल सांगता येत नाही.

परवा काही होईलही कदाचित, पण तोपर्यंत खूप उशीर झाला असेल.

— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.