रोजगाराच्या आकड्यांपलीकडे ..

रघुराम राजन म्हणतात तसं बेरोजगारीनं त्रस्त असलेले तरूण रस्त्यांवर येतीलही, पण कशासाठी? काय मागतील ते आणि काय होईल त्यातून? बेरोजगारी ही नुसती आकडेवारी नव्हे. ती एक अवस्था आहे. जे समाजाच्या तब्येतीचं कारणही आहे आणि परिणामही. ह्या पुढची १० वर्ष रोजगाराला केंद्रस्थानी ठेवून नियोजन केलं पाहिजे. तोच मार्ग आहे.

अनिल शिदोरे

— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —

कडक दुपारची वेळ. वृ्तपत्रं चाळत, बातम्या बघत बसलो होतो, आणि बेल वाजली. दार उघडलं तर समोर घामाघूम झालेला तरूण मुलगा हातात पार्सल घेऊन, सुरक्षित अंतर ठेऊन, उभा. त्यानी दिलेलं पार्सल घेतलं आणि त्याला घाम पुसताना पाहून विचारलं, “पाणी देऊ? थंड?”.. त्यावर तो क्षीणसा हसला. नंतर आमची दोन-पाच मिनिटं बातचीत झाली. त्यात कळलं ते असं.

नाव विलास. माजलगाव, बीडचा रहाणारा. भूगोलात पदव्युत्तर शिक्षण. गावी शेतीचा छोटा तुकडा. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता. त्या खर्चात वडिलांची दमछाक झाली. आता त्याची मिळेल ते करण्याची तयारी आहे. त्याला माहीत आहे कुरिअरची नोकरी आज आहे, उद्या नाही. त्याची धडपड चालू आहे. ती चालूच राहील.

विलास भेटला त्याच दिवशी वाचलं की एका मुलाखतीत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की बेरोजगारी अशीच चालू राहिली तर तरूण रस्त्यावर येतील. राजन अर्थतज्ञ आहेत. अर्थशास्त्राबाबत त्यांचे विचार निकोप असतात. त्यांनी असं विधान का केलं असावं? त्या विधानाच्या पुढचे आणि मागचे धागे काय आहेत?

साधारण २०१६ पासून आपल्याकडे “रोजगारविरहीत प्रगती” (Jobless Growth) होते आहे. म्हणजे प्रगती होते आहे. जीडीपी वाढतो आहे. शेअर बाजार वर जातो आहे, पण तितका रोजगार वाढत नाही. आकड्यांच्या जंजाळात आपण शिरायला नको, मात्र आपल्या आसपासचं चित्र काय आहे?

एक म्हणजे आधीच जिथे रोजगार आहे तिथेही दिला जात नाहीय. उदाहरण पहा. ह्या कोरोना काळात आरोग्य सेवेत कितीतरी पदं रिकामी आहेत हे आपल्याला दिसलं. म्हणजे पदं आहेत, मंजूर आहेत, त्यासाठी बजेट आहे, आरोग्यासारखं अत्यावश्यक काम आहे, तरीही पदं भरलेली नाहीत. रोजगार कागदावर आहे पण दिला जात नाही. तसंच दुसरं म्हणजे कायम स्वरूपी रोजगार ही कल्पनाही आता कमी होत चालली. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. कायम स्वरूपी रोजगारात सुरक्षितता आहे. भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, कंपनीनी केलेली निवासाची सोय ह्यातून जसा ऐदीपणा येऊ शकतो तशी स्थिरताही येऊ शकते. जी सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. जिचं सामाजिक मूल्यं आहे. पण सध्या सर्वत्र कंत्राटावर कामगार घेतले जात आहेत. त्यामुळे रोजगाराबाबत वातावरण असुरक्षित आहे. ज्यानं समाजस्वास्थ्यावर परिणाम होतो, तरूणांच्या जास्त.

रोजगारच नाही ही स्थिती तर आहेच पण त्याच बरोबर कमरोजगारी आहे — म्हणजे शिक्षण वरचं झालं आहे पण नोकरी त्यापेक्षा कमी कौशल्यं लागणारी, खालची म्हणून कमी पगाराची आहे. जसं मला भेटलेल्या कुरिअरवाल्या विलासचं आहे. ह्या कमरोजगारीबरोबर अर्ध-रोजगारीही आहे. म्हणजे एखाद्याची क्षमता खूप काम करण्याची आहे. रोजगार आहे पण पुरेसा नाही. वेळ आहे, उर्जा आहे पण त्याचा उपयोग नाही. एखाद्याचं सगळं कर्तुत्व पणाला लागेल अशी संधीच नाहीय. हे नुसत्या नोकरीत होत आहे असं नाही, धंद्यात, स्वत:च्या उद्योगातही होत आहे. शेतीत तर आहेच. शेतीवर अवलंबून आहेत अशांना पुरेसं काम नाही. शेतीचं अर्थचक्र असं आहे की त्यात काम करणं आकर्षक नाही. ह्या दोन्ही कारणांमुळे तिथे मोठं नैराश्य आहे. ही अर्धरोजगारी आहे. अशी अर्धरोजगारी महिलांच्या बाबतीत खूपच आहे. रोजगारात मुलींना, महिलांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे संधी मिळत नाही. त्यामुळेही नैराश्य आहे.

शिक्षण एका प्रकारचं आणि काम भलत्याच प्रकाराचं हे ही खूप आहे. ज्याला विजोड-रोजगारी म्हणता येईल. म्हणजे एखादा इंजिनीयर असतो पण तो एका वृत्तवाहिनीवर निवेदक म्हणून काम करतो. एखादं मानसशास्त्राचं उत्तम शिक्षण असणारी आणि त्याची आवड असणारी पोल्ट्री फार्मवर हिशेब ठेवण्याचं काम करते. शिक्षण, कौशल्य, अनुभव ह्याचा काही ताळमेळ नाही. अत्यंत नाखुषीनं काम ओढत ओढत नेलं जातं. ह्याला म्हणतात विरूप-रोजगारी किंवा विजोड-रोजगारी. त्यामुळे रोजगार मुळीच नाही हा जसा एक प्रकार आहे, ज्याला आपण बेरोजगारी म्हणतो पण त्याबरोबरच कमरोजगारी (रोजगार आहे पण मोबदला योग्य नाही), अर्धरोजगारी (रोजगार आहे पण कर्तुत्वाला वाव नाही) आणि विरूप-रोजगारीही (अनुरूप नसलेली) आहे. बेरोजगारीच्या ह्या विविध छटा समाजात सर्वदूर, सखोल पसरलेल्या आहेत, ज्यामुळे तरूणांमध्ये अस्वस्थता आहे.

ह्याला आणखी एक दुर्दैवी किनार आहे. ही आहे आज ह्या क्षणी भारताला मिळालेल्या एका विशिष्ट वरदानाची आणि ते मिळूनही आपण दाखवत असलेल्या करंटेपणाची. एखाद्या देशाच्या आयुष्यात साधारण एकदाच एक सुदैवी, सुसंधीचा विलक्षण काळ येतो. त्याला म्हणतात लोकसंख्येचा लाभांश. इंग्रजीत म्हणतात Demographic Divident. म्हणजे असं की “काम करणारी लोकसंख्या अवलंबून असलेल्या लोकसंख्येपेक्षा जास्त असणे”. म्हणजे कामाचे हात अधिक असणे. उत्पादनक्षमता जास्त असणे. म्हणजे, लहान बाळं, बालकं, ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक ह्यांच्यापेक्षा काम करू शकतील अशांची (वय १५ ते ६५) संख्या जास्त असणे.

आपल्या देशाच्या बाबतीत ही संधी २०१८ ला सुरू झाली आणि जवळजवळ ३७ वर्ष म्हणजे २०५५ पर्यंत आपली लोकसंख्या जगात सर्वात तरूण, उत्पादनक्षम आणि कार्य-उत्सुक असणार आहे. चीन २०३१ लाच वयस्क व्हायला सुरूवात करणार आहे. एक उदाहरण पहा, असाच लोकसंख्या लाभांशाचा काळ जपानला सुरू झाला १९६४ ला आणि संपला २००४ ला. १९६४ नंतर ७० च्या दशकात जपाननी कशी मुसंडी मारली होती ते आपल्या सर्वांना माहीत आहे. तशी संधी आपल्यालाही आहे. ३७ वर्षांचा काळ आहे. त्यातली तीन वर्ष संपली आहेत. २०१८ ला हा “लाभांश काळ” सुरू झाला आणि तेंव्हापासूनच नेमक्या त्याच वर्षापासून आपल्याकडे “रोजगार विरहीत प्रगती” (Jobless Growth) सुरू झाली. रघुराम राजन ह्यांना इथेच अस्वस्थ वाटत आहे.

फक्त राजन ह्यांना वाटतंय तसा तरूण रस्त्यावर येईल की नाही सांगता येत नाही, किंवा तो रस्त्यांवर येईलही पण आल्यावर कदाचित त्याच्या तोंडी घोषणा असेल रोजगार सोडून भलतीच कुठलीतरी. मग लोकसंख्यावाढीकडे बोट दाखवलं जाईल. इतर भावनिक गोष्टी पुढे केल्या जातील. असंतोषाला भलतीकडे नेण्याचा प्रयत्न होईल. आणि, मग आपल्या सगळ्यांचंच लक्ष मूलभूत आणि महत्वाच्या प्रश्नांकडून भलतीकडे जाईल.

समाजात फार मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असणं चांगलं नाही, कारण ती एक प्रकारची मानसिक अवस्था आहे. ज्याचा समाजाच्या स्वभावावर परिणाम होतो. समाज उदासीन बनतो. डिप्रेस्स्ड. समाजात नवनिर्मिती हळूहळू थांबते. कारण तरूण कामाशिवाय रहातो किंवा नको त्या कामात व्यस्त राहिल्यानं त्याला सृजनशील होता येत नाही. ह्यातून समाजातल्या वाईट गोष्टींचा प्रतिकार करण्याची समाजाची शक्ती कमी होते. नवविचारांचे अंकुर फुटत नाहीत. समाजातला तरूण धाडस करायला तयार होत नाही. रोजगार नाही म्हणून लग्नं जमत नाहीत. व्यक्तिगत आयुष्यात नैराश्य येतं. कुटुंबव्यवस्था कोलमडते. समाजाकडे तुच्छतेने पहाण्याची सवय वाढते. आपल्या जातीत, छोट्या समूहात मग गुरफटवून घेतलं जातं. ह्यातूनही राग आलाच तर तो व्यक्त करायला फेसबुक, व्हाॅटसअप आर्मीज आहेतच. मग समाज वायफळ, फुटकळ होत जातो. संकुचित होतो. कुंठीत होतो. सघन संस्कृती मागे पडते. प्रेरणांचे झरे फुटत नाहीत. जुना इतिहास, नवा भूगोल काढून, एकमेकांवर उखाळ्या-पाखाळ्या काढण्याची संस्कृती तयार होते. हे सारं एका बेरोजगारीमुळे होतं.

त्यामुळे तरूण-तरूणी रस्त्यावर येतीलही, नव्हे येतीलच. पण त्यांची मागणी रोजगाराशी संबंधित असेलच असं नाही. तरूणांमधील ह्या असंतोषाचा भडका उडायला कुठलंही साधं भावनिक कारण पुरेल. त्यात दहा-वीस वर्ष जातील. त्यात मग आपला कुरियरवाला विलासही म्हातारा होईल. देशाचा “लोकसंख्येचा लाभांश” काळही आला तसा निघून जाईल. संधी हुकेल. मग इतिहासाची पानं आपल्याला पुन्हा लिहिता येणार नाहीत. ह्या पुढच्या काळात “रोजगार निर्मिती” हे उद्दिष्ट ठेवून नियोजन करायला पाहिजे. राजकारणाचाही तो विषय झाला पाहिजे. सगळ्या समाजानं तसं ठरवलं पाहिजे. आपल्याकडच्या तरूणांच्या जिद्दीला, आकांक्षांना वाव हेच उद्दिष्ट असलं पाहिजे. बाकी कुठलंही नाही.

हे कसं करायचं ह्याचं उत्तर मात्र रघूराम राजन ह्यांनी दिलेलं नाही. ते देशाचा, राज्याचा कारभार आपण ज्यांच्या हातात सोपवला आहे त्यांनी दिलं पाहिजे. ते देत नसतील तर ते त्यांनी द्यावं म्हणून आपण काही केलं पाहिजे. ते काय केलं पाहिजे हा मात्र एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.