शिक्षणानं समाजाचं नेतृत्व करावं…

स्थित्यंतर हा समाजाचा स्थायीभाव आहे. समाज कायमच स्थित्यंतरातून जात असतो.

त्यामुळे सध्या तो स्थित्यंतरातून जात आहे ह्यात काही विशेष नाही. समाज जर तसा जात असेल तर शिक्षणही त्याप्रमाणे बदलत गेलं पाहिजे ह्याबाबतही काही संदेह मनात असण्याचं कारण नाही.

प्रश्न खरं तर हा आहे की समाजातल्या ह्या स्थित्यंतराचं आपलं आकल काय आहे? आणि, ह्यापुढचा समाज कसा असावा ह्याबाबतची आपली दृष्टी काय आहे? समाज कसा असावा ह्याबाबतची आपली जशी दृष्टी असेल त्या अनुरूप तशी शिक्षणव्यवस्था आपल्याला लागेल. समाजाचं स्वरूप हे जसं त्याच्या मुळाशी असलेल्या आर्थिक संबंधांवर, अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतं तसंच ते त्याची राजकीय, सांस्कृतिक, अध्यात्मिक अंगं आपली भूमिका कशी बजावतात ह्यावरही अवलंबून असतं. ह्याच बरोबर कुटुंबं, शासन, न्यायव्यवस्था ह्यासारख्या सामाजिक संस्थांचंही त्यात योगदान असतं. आणि, हे सगळं हलवतो, घडवतो माणूस. आणि, ह्या माणसाची जडणघडण शिक्षणातून होते. म्हणून शिक्षण, शिक्षणव्यवस्था समाजाची तब्येत टिकवण्याचं फार मूलभूत काम करते.

समाजाचं शिक्षण दोन प्रकारे चालू असतं. एक म्हणजे समाजात, माध्यमांद्वारे, स्वयंस्फूर्त संस्थांद्वारे, कुटुंबात, चित्रपट, साहित्य, लोककला, धार्मिक चालीरिती द्वारे अनौपचारिक पद्धतीनं, आणि दुसरं शाळा, महाविद्यालयं ह्या द्वारे औपचारिक पद्धतीनं.

आपण दोन्ही पद्धतींचा विचार केला पाहिजे. औपचारिक असो की अनौपचारिक, दोन्ही पद्धती तशा सुट्या नाहीत, त्यांचा एकमेकांवर परिणाम होतच असतो.

शिक्षणाचा हेतू काय?

शिक्षणाचा हेतू माणसाला माणूस म्हणून घडवणं हा आहे. त्याला जीवनासाठी घडवणं, त्याच्या मनाची मशागत करणं हा आहे. शिक्षणाचं उद्दिष्ट आहे असा माणूस घडवणं जो संवेदनशील आहे, जिज्ञासू आहे, ज्याला योग्य प्रश्न पडतात आणि ते विचारण्याचं धाडस त्याच्यामध्ये आहे. असा माणूस की ज्याच्या मध्ये स्वावलंबी होण्याचं ज्ञान, कसब आणि कौशल्य तर आहेच पण आपल्याबरोबर आपल्या परिवाराची, आपल्या समाजाची काळजी करण्याचं सामर्थ्यही त्याच्यात आहे. असा माणूस जो चांगला नागरिक आहे, सामाजिक प्रक्रियांमध्ये जो सहभागी होतो. माणसाला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेनं नेण्याचं, शहाणं करण्याचं आणि व्यापक विचार करायला लावण्याचं काम शिक्षण करतं. शिक्षण माणसाच्या बौद्धिक, वैचारिक, सामाजिक, अध्यात्मिक, भावनात्मक, सृजनशील क्षमता विकसित करतं. शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी माणसाला पुढे नेते. शिक्षण माणसाच्या मनात प्रश्न निर्माण करतं. शिक्षण माणसाला जगाकडे कसं पहायचं ह्याची दृष्टी देतं. हे जग कसं हवं हे समजण्याची आणि त्याची कल्पना करण्याची ताकद शिक्षण देतं. एकंदरितच जगण्याला भिडण्याची, वास्तवाला सामोरं जाण्याची उर्जा शिक्षण देतं. शिक्षण चहूबाजूनी माणसाला घडवतं, त्याला पैलू पाडतं.

शिक्षण माणसाच्या मनात आणि समाजात मूल्यं रूजवतं. साधे किंवा गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायचा तर्क देतं. शिक्षण माणसाला स्थिर करतं. शिक्षण माणसाला प्रगल्भ करतं. निरीक्षण, तर्क, आकलन, मांडणी, तुलना, न्याय, समज, अभ्यास, संशोधन, कलास्वाद ह्यासारख्या गोष्टींचं कौशल्य आणि कसब शिक्षण देतं.

माणसाच्या प्रगतीत अनौपचारिक शिक्षणाचा वाटा अधिक

औपचारिक शिक्षण हे आत्ता आत्ता आपण स्विकारलेलं आहे. माणसाची एकंदर प्रगती पाहिली, इतिहास पाहिला की कळतं माणसानं सुरूवातीला अनौपचारिक शिक्षणातून किती मोठी मजल मारली आहे ते. इतिहासाच्या एका टप्प्याला त्याला कळलं की ह्याचं औपचारिकीकरण केलं पाहिजे. ते ही आत्ता आत्ता. त्याला हे समजलं की शिक्षणाच्या नाजूक प्रक्रियेला एका व्यवस्थेत बांधलं पाहिजे. असं जरी त्याला वाटलं असलं तरी शिकार करून आल्यावर जेवण झाल्यावरच्या शेकोटीभोवतीच्या गप्पा, बुजुर्गांनी सांगितलेल्या गोष्टी, मागच्या पीढीकडून पुढच्या पीढीकडे आलेलं ज्ञान, माहितीचा ठेवा, परंपरांचा वारसा, जगण्याची किंवा जिवंत रहाण्याची अंत:प्रेरणा अशा गोष्टीतून माणूस शिकत शिकत गेला. चुका करत शिकला. ठेचकाळत, अपयशानं शिकला. माणूस शिकला तो संघर्षातून, स्पर्धेतून, विपरित परिस्थितीत लढून. माणूस शिकला तो नवनव्या गोष्टींच्या जिज्ञासेतून, उत्सुकतेतून आणि नवं जाणून घेण्याच्या उर्मीतून. ह्या सगळ्यातून अत्यंत सहज, अनौपचारिक पद्धतीनं माणसानं शिक्षण घेतलं.

माणसाच्या शिक्षणाचा इतिहास जर आपण गेल्या ५०,००० वर्षांचा आहे असं क्षणभर मानलं तर त्यातली अवघी ३००-३५० किंवा फारतर ५०० वर्ष आपण सार्वत्रिक औपचारिक शिक्षण घेतो आहोत. त्यामुळे माणसाच्या शिक्षणाचा हिशेब मांडला तर त्यातल्या अनौपचारिक शिक्षणाचं प्रमाण खूपच आहे हे आपल्या लगेच लक्षात येईल.. अगदी आजही शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांच्या पलीकडे कितीतरी शिक्षण चालू आहे, चालू असतं, चालू राहील.

समाजबदलाच्या तीन मोठ्या प्रक्रिया

आपण आपल्या मागच्या समाजांचा मागोवा घेतला तर आपल्या हे ही लक्षात येईल की हे सहस्त्रक बदलता बदलता आपल्या समाजात फारच गतीनं स्थित्यंतर झालं. त्याची गती हा एक काळजीचाच विषय होता. आपण आपला देश डोळ्यापुढे ठेवला तर तीन मोठ्या प्रक्रिया हे सहस्त्रक संपता संपता घडत होत्या. ज्यानं ह्यानंतरचा समाज, ह्यापुढचा समाज कसा असेल हे ठरणार होतं.

ह्या तीन मोठ्या गोष्टीतली पहिली गोष्ट म्हणजे सगळा समाज बाजारकेंद्री झाला. दुसरी गोष्ट म्हणजे व्यक्ती आत्मकेंद्री झाली, आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाजमाध्यमं समाजातील विविध प्रक्रियांवर परिणाम करण्याच्या केंद्रस्थानी आली. ह्या समाजमाध्यमांनी इतका प्रभाव टाकला की समाजातली एकता, लोकशाही, निवडणुका, संस्कृती ह्यावर त्याचा फार मोठा परिणाम व्हायला ह्याच काळात सुरूवात झाली. सामाजिक चौकटीत धर्म, शाळा, शासन ह्याप्रमाणे “समाजमाध्यमं” ह्या एका नव्या सामाजिक संस्थेचा उदय झाला.

समाजवादी आणि भांडवलशाही अशा दोन गटात पूर्वी जग साधारणपणे विभागलेलं होतं. त्यात बदल झाला. भांडवलशाही जिंकली. ती टिकली. समाजवादी जगाचे असंख्य तुकडे झाले. धर्म ही गोष्ट जास्त महत्वाची झाली. देशात १९९१ च्या सुमारास आर्थिक उदारीकरणानं देशाचा आर्थिक ढांचा बदलला. आर्थिक बदलला म्हणून सामाजिक बदलला, राजकीय बदलला. त्याचे परिणाम पुढच्या २५ वर्षात अधिकच गडद दिसायला लागले. सांस्कृतिक क्षेत्रातही वेगळ्या गोष्टी उमटू लागल्या. अगोदरच शिकलेला, उच्च जातीतला मध्यमवर्ग ह्या बदलाचा फायदा घ्यायला मोक्याच्या जागी उभा होता. जग जसजसं जवळ आलं, भारताचा व्यापार बाहेरच्या जगाशी जसजसा सुरू झाला, परदेशी भांडवल ज्या प्रमाणात देशात येऊ लागलं तसा हा तरूण परदेशी जाऊ लागला. सहज जाऊ लागला. “मला अधिक हवं, अधिक हवं” ह्या प्रेरणेनं हा मध्यमवर्ग झपाटला. नंतर मग सारा समाजच ह्यानं पेटला. “जे खरं चांगलं ते चांगलं, जे टिकाऊ ते चांगलं” हे जाऊन “जे यशस्वी तेच चांगलं” ह्याची चलती सुरू झाली. प्रत्येक गोष्टीची किंमत ठरायला लागली. प्रत्येक गोष्टीचा सौदा सुरू झाला. मग ती बांधीलकी असो की तुमचं कौशल्यं. माहिती किंवा ज्ञान ही विक्रीयोग्य गोष्ट झाली. प्रत्येकानं आपली आपली किंमत ठरवली. इतकी की ह्यानं लग्न, कुटुंबं ह्या संस्थाही सुटल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण किती आहे ह्याचं लेबल म्हणजे पदवी ही देखील विक्रीयोग्य वस्तू झाली. बरं, परत हा बाजारही खुला नव्हता. आधीच पुढे असलेले ह्याचा अचूक फायदा घेतील अशीच त्यात मांडणी होती. प्रत्येकालाच वर वर जायचंय त्यामुळे कुणालातरी खाली खेचल्याशिवाय, किंवा कुणाच्यातरी डोक्यावर पाय दिल्याशिवाय वर जाता येणार नाही हे प्रत्येकाला पटलं. त्यामुळे सवलती, आरक्षण, मग आरक्षणासाठी माझी जात, माझ्या सुरक्षेसाठी माझा धर्म सर्वांना सोयीचा वाटू लागला. माझ्या वर जाण्यासाठी ती शिडी होती. ज्याचा वापर करणं माझ्यासाठी कर्मप्राप्त होतं.

माझ्या शिक्षणाचा हेतू त्यामुळे बाजारात माझी किंमत वाढवणे ह्यापेक्षा दुसरा तिसरा काही नव्हता. माणूस घडवण्याचं थांबलं, माणसाऐवजी कामगार घडवणं सुरू झालं. मग तो अंगमेहनती कामगार असो की मेंदूमेहनती कामगार. पैसा फिरणे, व्यापार वाढणे, अधिक भांडवलाकडे अधिक भांडवल जाणे ह्यासाठी उच्च शिक्षणाचा उपयोग अधिक होऊ लागला. माणूस होण्यापेक्षा मी अधिक चांगली वस्तू झालो, अधिक चांगला ग्राहक झालो, अधिक कार्यक्षम उपभोक्ता झालो. ध्येयवेडे शिक्षक, सामाजिक बांधीलकीनं चालवलेल्या शिक्षण संस्था हळूहळू क्षीण झाल्या, अस्तंगत झाल्या. त्या संदर्भहीन बनल्या. ते शिक्षण देत असलेल्या शिक्षणात ही ताकदच नव्हती की समाजानं भानावर असावं, उन्माद करू नये, समाजातलं संतुलन टिकावं. जागतिक उदारीकरणाच्या वावटळीत त्यांचं ध्येयवेडेपण पाचोळ्यासारखं उडून गेलं. त्यांची मूल्यव्यवस्था पायदळी तुडवली गेली, नवी मूल्यव्यवस्था पुढे आली. पंचवीस एक वर्षात सगळे संदर्भ बदलले. बदलाचं एक आवर्तन पूर्ण झालं.

समाजात असलेला हा बाजारूपणा आणि त्यामुळे शिक्षणाला आलेला ओंगळपणा आणि त्यामुळेच शिक्षणाचा झालेला बाजार असं हे चक्र गेल्या २५ वर्षात फिरलं.

वर वर जाण्याच्या स्पर्धेत मी सोडून बाकी सगळेच माझे स्पर्धक झाले. “मी आणि माझं” हा परवलीचा शब्द झाला. मला भिती वाटायला लागली. मी अधिक एकाकी झालो. एकटा पडलो. मी, माझी भूक, माझी इच्छा, माझं दिसणं, माझा पैसा, माझं सुख, माझा भोग, माझ्यासाठी सोयी ह्याकडे माझा आपोआपच प्रवास सुरू झाला. त्यामुळे काही निर्माण करुन ते लोकांना आवडेल की नाही हा धोका घेण्यापेक्षा प्रेक्षक होणं, उपभोक्ता होणं मला जास्त सोयीचं होतं. कारण तसं करण्यात सुरक्षा होती, आराम होता, कष्ट कमी होते, धोका कमी होता. प्रत्यक्ष नवं लिहिण्यापेक्षा ते फाॅरवर्ड करण्याकडे, काही सृजनशील निर्माण करण्यापेक्षा वाचण्याकडे, लढण्यापेक्षा लढाई बघण्याकडे, खेळण्यापेक्षा खेळ बघण्याकडे आपसूकच मी ओढला गेलो. ते मला सोयीचं होतं. नवी प्रेक्षक संस्कृती सुरू झाली. माझा वेळ ह्यामुळे अधिक चांगला जाणार होता. त्यामुळे मग निर्मितीपेक्षा त्याचा आस्वाद घेण्याकडे मी वळलो. मला नकोच होतं ते, त्यामुळे मला आव्हान देणारं, प्रश्न उपस्थित करणारं, आत्मबल वाढवणारं, आत्मविश्वास देणारं शिक्षणही मला नको होतं. ते मलाही बरं होतं आणि व्यवस्थेच्या दृष्टीनंही आवश्यक होतं. ती बाजाराचीही गरज होती. बाजारात अशी बंडखोरी चालत नाही. तसंच घडलं.

आम्हाला असं वाटत होतं की आर्थिक प्रगती झाली की आपोआप त्यामुळे आर्थिक विषमता कमी होईल. तशी ती झालीही पण ज्ञाननिर्मिती, संशोधन ह्या गोष्टी अधिक आकुंचन पावत गेल्या. त्या थोड्यांच्याच मक्तेदारी बनल्या. तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं थोड्या लोकांच्या अफाट संशोधनातून अफाट लोकसंख्येच्या उपभोगी समाजाला नवनव्या गोष्टी पुरवणं शक्य व्हायला लागलं. समाजा समाजात फार फरक निर्माण झाला, विषमता तयार झाली. माझं असं निरीक्षण आहे की अमेरिका, युरोपमधल्या काही निवडक संशोधनशाळातून ज्या काही गोष्टी निर्माण होत आहेत, आपल्या पुढच्या समाजाची ते जी काही आकांक्षा मनात आखत आहेत त्याचा आणि आपल्या बहुसंख्यांचा काहीही संबंध नाही. आपला संबंध आहे फक्त ते निर्माण करत आहेत त्या गोष्टींचा ग्राहक बनण्यापुरता आणि आपण निदान त्याचे ग्राहक तरी व्हावे ह्यासाठी प्रयत्न करण्यापुरता. मग तो आयफोन असो की एखादी चित्रपटातून दाखवली जाणारी नवकल्पना. किंवा, एखाद्या ब्रॅण्डेड शर्टाचं डिझाईन असो की एखादं महत्वाचं औषध. माझी धडपड फक्त ह्या सर्वांचा ग्राहक म्हणून तरी मी टिकावं इतके पैसे मिळवण्यापुरती उरली. मी काही निर्माण करेन, मी काही वेगळा विचार करेन ह्याचा ध्यास घेण्याची माझी उर्मीच कापून टाकण्यात आली.

असा हा ह्या सहस्रकाच्या मागे पुढे झालेल्या सामाजिक, आर्थिक बदलांचा महिमा आहे.

बदलत्या समाजात शिक्षण

समाज जेंव्हा अशा स्थित्यंतरातून जात होता तेंव्हा शिक्षणाची परिस्थिती काही वेगळी नव्हती. तशीच होती. अनौपचारिक शिक्षणाची सगळी माध्यमं बाजारानं उठवलेल्या सोसाट्याच्या वादळानं दिग्मुढ झाली होती. बाजार समाजाला दिशा देत होता. नव्या समाजाचं दिग्दर्शन करत होता. माध्यमांना आशयापेक्षा जाहिरात महत्वाची होती. ते तसंच वागत होते. तशाच प्रकारचं खमंग, सवंग करमणुकीचं ताट दूरदर्शन समोर ठेवत होतं. अधिक अधिक मिळवण्याच्या धडपडीत कुटुंबातलं अनौपचारिक शिक्षण आटत गेलं होतं. मुलांना, कुटुंबाला शिकवत बसण्याइतपत वेळच लोकांना उरला नव्हता. नंतर जो वेळ होता तो ही व्हाॅट्सप, फेसबुक, सेल्फी मध्ये जाऊ लागला. तिथूनचा काय तो समाज शिकत होता. त्यातला तोकडेपणा, फोलपणा लक्षात येण्याइतपत उसंतही आम्हाला नव्हती. आजही ती नाही. माणूस म्हणून किंवा नागरिक म्हणून माझं शिक्षण थांबलं. कामगार म्हणून किंवा ग्राहक म्हणून माझं शिक्षण जोरात सुरू राहिलं. नवा विचार समजण्याऐवजी बुटाचं नवं डिझाईन सांगण्याच्या जास्त गोष्टी माझ्या समोर येत होत्या. समाजाला जे हवं, जसं हवं ते देण्याचं काम आणि बाजार जी मागणी करतोय ती किंवा जशी मागणी करतोय तसा पुरवठा करण्याचं काम अनौपचारिक शिक्षण करत होतं. मग ते शिक्षण कुटुंबातलं असो, वृत्तपत्रातलं असो की धर्माचं. अगदी सामाजिक आणि स्वयंस्फूर्त संस्थाही तुमच्या सोयीसोयीनं तुम्हाला जे हवं ते पुरवत गेल्या. असंतोषाचा अंगार फुलवत समाजाचं पोषण करू शकतात अशा संस्थांची पर्यटन स्थळं झाली. तिथं काम करतात अशांच्या पाया पडण्यात आणि त्यांना पुरस्कार देण्यात आमची शक्ती खर्ची पडू लागली. आम्हालाही असे पाय हवेच होते की ज्यांच्या पाया पडलं की आमच्या सदसदविवेक बुद्धीचा अनुशेष भरून जाणं होत राहील. आमच्या रोजच्या पापाचं परिमार्जनही त्यामुळे होईल.

त्यामुळे समाजातल्या अनौपचारिक शिक्षणाची केंद्रं क्षीण क्षीण होत गेली. औपचारिक शिक्षण तर थेट बाजाराचाच भाग झालं, अगदी स्पष्टपणे. बाजार मागेल तसं पुरवत जाणं इतकंच काम शैक्षणिक संस्थांचं राहिलं. शिक्षणक्षेत्रं हा एका बाजाराचा भाग आहे हे तर आता इतकं मान्य आहे की जे काही असेल तितका भाव लावा पण आम्हाला डिग्रीचं लेबल द्या हे आता समाजानंही मान्य केलं. सुमारे १२ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात हजार किलोमीटर्सची पदयात्रा आम्ही काढली तेंव्हा ग्रामीण भागातली उत्तम शाळा म्हणून आम्हाला जी सांगायचे त्या शाळेत गणवेष उत्तम असायचा, भिंती उत्तम असायच्या, फळे उत्तम असायचे, परिक्षा सोप्या असायच्या. हे सर्वांच्याच सोयीचं होतं. मलाही मग कडक इस्त्रीचे कपडे घालून “गुड माॅर्निंग” असा आवाज टाकणारी मुलं म्हणजे शिकलेली मुलं असं वाटायला लागलं होतं. ही औपचारिक शिक्षण व्यवस्था बाजाराच्या इतकी अधीन झाली की जणू बटिकच वाटावी. आजही मी राष्ट्रीय शिक्षणाचा अंगार ज्यांनी पेटवला अशा शिक्षणसंस्था एखाद्या गुलामासारख्या बाजारापुढे हात जोडून उभ्या असतात हे पहातो तेंव्हा माझी मलाच लाज वाटते. तिकडे वरती कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले किंवा लोकमान्य टिळकांसारख्यांना हे पाहून काय वाटत असेल असं सारखं वाटत रहातं.

वास्तविक औपचारिक शिक्षण हे असं क्षेत्रं आहे की जे कुणाचं बटिक होऊ नये. शिक्षणानं समाजाचं नेतृत्व करावं. समाजाला दिशा द्यावी. समाजातील अनौपचारिक शिक्षणाला आशय द्यावा. बाजाराऐवजी शिक्षणानं समाजाचा कणा व्हावं. अर्थात हे बोलणं सोपं आहे. पण ते करणार कसं? हे दिवास्वप्न न रहाता तशी भूमिका शिक्षणानं कशी प्रत्यक्षात उतरवावी?

शिक्षण क्षेत्रानं तीन महत्वाच्या गोष्टी कराव्यात

मी खूप वेळा अमेरिकेकडे पहातो आणि मला प्रश्न पडतो की अमेरिकेची ताकद कशात आहे? मग वाटतं की अमेरिकेची ताकद दोन गोष्टींमध्ये आहे. एक म्हणजे तिची “विद्यापीठं”, जी संशोधनाची, नवनिर्मितीची, सृजनशीलतेची आणि मूलभूत विचारांची केंद्रं आहेत. आणि, दुसरं म्हणजे तिथल्या “नागरिकांच्या सामाजिक संस्था” ज्या समाजशिक्षणाचं, सामाजिक पालनपोषणाचं, समाज जागृतीचं काम सातत्यानं करत रहातात. आपली, आपल्या महाराष्ट्राचीही साधारण १०० वर्षांपूर्वी नेमकी हीच शक्तीस्थळं होती, जो महाराष्ट्राचा रेनेसान्स किंवा उत्तुंग प्रगतीचा काळ मानता येईल. अशी परिस्थिती पुन्हा येऊ शकते पण त्यासाठी काही निश्चित पावलं उचलावी लागतील. ठाम उभं रहावं लागेल. काही कालबद्ध मिशन चालवावं लागेल.

पहिलं म्हणजे शिक्षण हे स्वावलंबी, स्वायत्त असावं. अनौपचारिक शिक्षण तसं असतंच, पण औपचारिक शिक्षणही तसं असावं. फक्त लहान मुलांना आणि विद्यार्थी दशेतील तरूणांना नाही तर सगळ्या समाजालाच औपचारिक शिक्षण लागतं. व्यक्तींना लागतं, उद्योगांना लागतं. सगळ्यांना लागतं. त्यामुळे ज्यांच्याकडून औपचारिक शिक्षणाला ताकद मिळू शकेल अशांची व्याप्ती खूप मोठी आहे. तशी बांधणी करावी लागेल. उद्योगसमूहांना शिक्षीत, कौशल्यवान, शहाणा कामगार लागतो. एकदा एखादा कोर्स करून झालं की संपलं असं होत नाही. तंत्रज्ञानातील सततच्या प्रगतीनं त्यांना सतत कार्यतत्पर रहाणं आवश्यक असतं. त्यामुळे उद्योगसमूह अशा कामासाठी सहाय्य करतील. सध्याही त्यांचे त्यांचे अभ्यासक्रम आहेतच पण ती मंडळी शिक्षणशास्त्रात पारंगत नसल्यानं त्यांची शिक्षणपद्धती फार हास्यास्पद असते. मग ते “व्यवस्थापकीय सल्लागार” संस्थांना कामं देतात. तेही उद्योगसंस्थांची गरज आणि अगतिकता ओळखून वारेमाप शुल्क आकारतात. फायदा कमावतात. वास्तविक हे काम विद्यापीठांचं आहे. त्यामुळे स्वावलंबीकरणाच्या विविध कल्पना शिक्षणसंस्थांनी अंगिकारल्या पाहिजेत. ह्यात शासनापासूनही “स्वायत्तता” ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे.

दुसरं म्हणजे शिक्षणसंस्था ह्या समाजाभिमुख असाव्यात. पण त्या समाजाभिमुख कधी होतील जेंव्हा त्यांना त्यांच्या गुणवत्तेबाबत सूट घेऊन चालणार नाही असं होईल तेंव्हा. समाजानं ठरवावं ना ह्यांची गरज आहे की नाही ते. माझ्या मते वेतन आयोगांमुळे किंवा सरकारी अनुदानांमुळे शिक्षणसंस्था समाधानी, संतुष्ट आणि संपृक्त झाल्या आहेत. त्यांना अस्तित्वासाठी त्यांची गुणवत्ता राखण्याची गरज वाटत नाही. समाजाशी जोडलं गेलंच पाहिजे अशी आवश्यकताही वाटत नाही. ह्यात अमूलाग्र बदल केला पाहिजे. वेतन आयोगांचं पांघरुण फेकून दिलं तर अशा शिक्षणसंस्था काही महत्वाचं काम करू शकतील. समाजाचं नेतृत्व करू शकतील. ह्या समाजाभिमुख होण्याची विविध प्रारूपं निर्माण केली पाहिजेत. समाजाला त्यांच्या गुणवत्तेचं परिक्षण करायला लावलं पाहिजे. कमअस्सल शिक्षण लोकच का स्विकारतील? त्यामुळे गुणवत्ताच ठरवू दे ना अशा शिक्षणसंस्थांचं अस्तित्व.

तिसरं म्हणजे शिक्षण संस्थांना त्यांचं पारंपारिक शिक्षणशास्त्र फारच अमूलाग्र बदललं पाहिजे. शिक्षणशास्त्र किंवा शिक्षणपद्धती. झालं असं की माणसाचं मानस गेल्या २५ वर्षात फार बदललं. त्याची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता क्षीण झाली. त्याची आकलनशक्ती, निरीक्षणातून अनुमान बांधण्याची क्षमता, ग्रहणशक्ती बदलली. आसपासच्या गोष्टींचा त्याच्या मेंदूवर परिणाम झाला. सहज कॅलक्यूलेटर असल्यानं तोंडी गुणाकार आता तो विसरला पण आसपासच्या जगाची माहिती घेण्याचं कसब ह्याच तंत्रज्ञानानं त्यानं आत्मसात केलं. शास्त्रज्ञांचं तर म्हणणं असं आहे की तंत्रज्ञानाच्या ह्या प्रगतीनं किंवा बदलानं हळूहळू माणसाचा मेंदू, त्याच्या क्षमताच बदलत आहेत. तंत्रज्ञान बदललं, साधनं बदलली त्यामुळे ग्रहणाची, आकलनाची पद्धतही बदलली. ह्या बदलाच्या अनुरूप आपली शिक्षणपद्धती बदलली का हा एक मोठा प्रश्न औपचारिक शिक्षणापुढे आहे. येत्या काही काळात ह्या क्षेत्रातल्या धुरीणांनी ह्यावर मार्ग शोधला पाहिजे. आणि, हे करताना पाश्चिमात्यांचं निव्वळ अनुकरण नको कारण फिनलंड सोडलं तर ह्यावर कुणाला उपाय सापडला आहे असं वाटत नाही. पाऊलो फ्रेअरी, ईव्हान ईलीच किंवा गांधीजींनी ह्या मार्गावर काही प्रगती करून ठेवली आहे पण त्यांच्या काळात माणसाचं त्याच्या अस्तित्वापासून किंवा आसमंतापासून इतकं तुटलेपण आलेलं नव्हतं. अर्थात ह्या मंडळींनी काही प्राथमिक विचार केलेला आहे ज्याचा आपल्याला उपयोग होईल.

अनौपचारिक शिक्षण त्याचा त्याचा मार्ग सापडवेल पण औपचारिक शिक्षणानं स्वायत्तता, गुणवत्ता आणि नवं शिक्षणशास्त्र अशी त्रिसूत्री अंगिकारून मार्गक्रमणा केली पाहिजे. तसं केलं तर आपल्या समाजाला एक दिशा मिळू शकेल. नाहीतर पुन्हा कधीही प्रगती होऊच शकणार नाही अशा कडेलोटाशिवाय वेगळं भविष्य मला तरी दिसत नाही.

अनिल शिदोरे
anilshidore@gmail.com

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.

In politics since 12 years by compulsion.. after spending three decades in social sector, felt that politics could be probably only solution for social change.